भारतातील वर्ल्डकपसाठी पर्यायी योजना तयार

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 8 April 2021

भारतात रोज एक लाखाच्या नजीक कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच वातावरणात आयपीएल प्रेक्षकांविना शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

T20 World Cup ; दुबई : भारतातील कोरोना रुग्ण वाढत असले तरी सद्यपरिस्थितीत भारतातील विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धा अन्यत्र हलवण्याचा आयसीसीचा विचार नाही, पण आम्ही पर्यायांचा विचार केला आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अंतरिम सीईओ जेफ अॅलार्डाईस यांनी सांगितले.

विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. काही दिवसांपासून भारतात रोज एक लाखाच्या नजीक कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच वातावरणात आयपीएल प्रेक्षकांविना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. विश्वकरंडक टी- २० स्पर्धेची पूर्वतयारी ठरल्यानुसार सुरू आहे, आम्ही पर्यायी योजना तयार केली आहे. अर्थात ती अमलात आणण्यास अद्याप सुरुवात केलेली नाही. आम्ही सातत्याने भारतीय मंडळाच्या संपर्कात आहोत. आवश्यकता भासल्यास पर्यायी योजना कार्यरत होईल, असे अॅलाडाईस यांन सांगितले.

आयसीसीने मनू साव्हनी यांना त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल काही आठवड्यांपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत अॅलाडाईस काम बघत आहेत. ऑस्ट्रेलियाचे अॅलाडाईस यांनी आम्ही अन्य खेळांच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा करीत आहोत. क्रिकेट लढती होत असलेल्या देशांकडून त्यांचे अनुभव घेत आहोत, पण त्याचबरोबर अन्य खेळांच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा होत आहे.

अमिरातीचा पर्याय
विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धा भारतात न झाल्यास अमिरातीत होऊ शकेल असा विचार होत आहे. अर्थात तेथील परिस्थितीवर सर्व काही अवलंबून असेल. त्याच वेळी अॅलाडाईस यांनी आंतरराष्ट्रीय सामने, स्पर्धा तसेच देशांतर्गत स्पर्धा घेण्यापूर्वी सध्याच्या परिस्थितीत क्रिकेट मंडळांना सातत्याने सरकारच्या संपर्कात राहावे लागत आहे. काही देशांनी सामन्यांचे चांगले आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या