RSWS Final : इंडिया लिजेंड्सचा डंका; लंकेच्या दिग्गजांना शह देत जिंकली ट्रॉफी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 22 March 2021

2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने  श्रीलंकेला नमवत वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी सचिनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेलाच्या दिग्गजांना गुडघे टेकावे लागले.    

 India Legends Win Road Safety World Series title इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेला नमवत रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज दिमाखात जिंकली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रायपूरच्या शहिद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील ब्ल्यू जर्सीतील दिग्गजांनी बहरलेल्या टीम इंडियाच्या विजयाने 2011 च्या वर्ल्डकप फायनलच्या आठवणीला उजाला मिळाला. 2011 मध्ये भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला नमवत वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी सचिनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेलाच्या दिग्गजांना गुडघे टेकावे लागले.    

भारतीय संघाच्या विजयात युसूफ पठाणने अष्टपैलू कामगिरी बजावली. आघाडी कोलमडल्यानंतर त्याने 62 धावांची उपयुक्त खेळी केली. याशिवाय गोलंदाजीमध्ये दोन विकेटही मिळवल्या. युसूफ पठाणच्या खेळीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 181 धावा केल्या होत्या. यात युवराज सिंगने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना श्रीलंका लिजेंड्सचा संघ निर्धारित 20 षटकात 7 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारु शकला. श्रीलंकेकड़ून सनथ जयसूर्याने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या दिलशानला फायनलमध्ये केवळ 21 धावांचे योगदान देता आले.  

सेहवाग आणि तेंडुलकर जोडीने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 19 धावा असताना सेहवाग तंबूत परतला. त्याने 12 चेंडूत 10 धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या ब्रदीनाथ  7 धावा करुन माघारी फिरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 23 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 30 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर सामन्याची सूत्रे युसूफ आणि युवीने आपल्या हाती घेतली दोघांनी अर्धशतके झळकावताना 85 धावांची भागीदारी केली. युवीने 41 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 60 धावा करुन बाद झाला. युसूफ पठाण 36 चेंडूत नाबाद 62 आणि इरफान पठाणने तीन चेंडूत नाबाद 8 धावांची खेळी करत इंडिया लिजेंड्सच्या धावफलकावर 181 धावा लावल्या. 

या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांना चांगली सुरुवात करुन दिली. दिलशान-जयसूर्याने पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. युसूफ पठाणने दिलशानला 21 धावांवर तंबूत धाडले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या चमिरा सिल्वाला इरफान पठाणने अवघ्या 2 धावांवर बाद केले. युसूफ पठाणने जयसूर्याच्या तुफानी खेळीला ब्रेक लावत सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकवला. उपुल थरंगा 13, जयसिंगे 40 आणि कौशल्य वीररत्ने 38 धावा करुन माघारी फिरली. भारताकडून पठाण बंधुनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. तर मुनाफ आणि मनप्रीत यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. जयसिंगेच्या रुपात श्रीलंकेने एक विकेट रन आउटच्या रुपात गमावली.


​ ​

संबंधित बातम्या