IND L vs WI L : इंडिया लिजंड्स फायनलमध्ये, लाराच्या टीमचा 12 धावांनी पराभव

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 17 March 2021

इंडिया लिजंड्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज लिजंड्सच्या डावाची सुरुवात खराब झाली.

Road Safety World Series T20 2021 India Legends vs West Indies Legends, Semifinal 1 :  रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजंड्सने ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज लिजंड्सला 12 धावांनी पराभूत केलं. या विजयासह इंडिया लिजंडसने फायनलमध्ये धडक मारली आहे. इंडिया लिजंड्सने दिलेल्या 219 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज लिजंड्सच्या डावाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात सलामीवीर विल्यम पर्किन्सला गोनीने बाद केलं. मात्र त्यानंतर ड्वेन स्मिथ आणि नरसिंग देवनारायण यांनी 99 धावांची भागिदारी केली. स्मिथने 36 चेंडूत 63 धावांची खेळी केली. यानंतर किर्क एडवर्ड मैदानात आला पण त्याला प्रग्यान ओझाने शून्यावर बाद केलं.

एडवर्डनंतर दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा मैदानात आला. त्यानं देवनारायणच्या साथीनं अखेरच्या षटकात फटकेबाजी केली. मात्र संघाच्या 200 धावा झाल्या असताना लाराला विनयकुमारने बाद करून मोठा अडथळा दूर केला.  शेवटच्या षटकात चार चेंडूत 16 धावा हव्या असताना अर्धशतकी खेळी करणारा देवनारायण बाद झाला. त्यांचा डाव 206 धावांवर आटोपला.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिज लिजेंडविरुद्धच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये इंडिया लिजेंड्स संघाने धमाकेदार सुरुवात केली.  सचिन सेहवाग जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. विरेंद्र सेहवाग 17 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 धावा करुन परतल्यानंतर कर्णधार सचिन तेंडुलकरने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 42 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. तो आणखी काही धावांची भर घालण्याच्या मूडमध्ये असताना एडवर्ड्सच्या गोलंदाजीवर बेस्टने त्याचा बेस्ट झेला टिपला.  बाद होण्यापूर्वी सचिनने मोहम्मद कैफसोबतही 53 धावांची भागीदारी रचली होती. 

सुरुवातीच्या काही सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिनसह मोठी खेळी करण्याची क्षमता असलेल्या इंडिया लिजेंड्स संघातील फलंदाजांना विशेष छाप सोडण्यात अपयश आले. मात्र अखेरच्या टप्प्यात स्टार खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिला सामना हा वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. या सामन्यात सेहवागने 74 धावांची खेळी केली होती तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलक 36 धावा केल्या होत्या. स्पर्धेतील दुसरा सामना टीम इंडियाच्या दिग्गजांनी श्रीलंकेविरुद्ध खेळला. यावेळी सचिनला खातेही उघडता आले नव्हते.

हे वाचा - युवीच्या भात्यातून पुन्हा एकदा षटकारांची बरसात

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सचिन-सेहवाग जोडीने एकहाती संघाला विजय मिळवून दिला. यात विरुने नाबाद 80 तर सचिनने 33 धावांनी नाबाद खेळी केली होती. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकर अवघ्या 9 धावा करुन बाद झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिने तेंडुलकरच्या भात्यातून फटकबाजी पाहायला मिळाली. त्याने अवघ्या 37 चेंडूत 60 धावा कुटल्या होत्या. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावले..

युवराजची पुन्हा फटकेबाजी 

युवराजने फटकेबाजी करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सिक्सर किंग युवराजने महेंद्र नागामुट्टीच्या पहिल्या तीन चेंडूवर षटकार खेचले. चौथ्या चेंडूवर धाव घेता आली नाही. मात्र पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार लगावला. अखेरचं षटक टाकणाऱ्या सुलेमान बेनच्या षटकातही दोन षटकार मारले. अठराव्या षटकात युवराज सिंगचा झेल सुटला होता. त्यावेळी त्यानं 9 चेंडूत फक्त 10 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर 19 व्या षटकात त्यानं सामन्याचं चित्रच बदललं. युवराजनं त्यानंतर 7 चेंडूत जवळपास 5 षटकार खेचले. संघाचा डाव संपेपर्यंत 20 चेंडूत त्याच्या खात्यात 49 धावा जमा झाल्या होत्या. युवराज सिंगने रोड सेफ्टी सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिका लिजंड्सविरुद्ध सलग चार षटकार मारले होते. 


​ ​

संबंधित बातम्या