भारताला फलंदाजीत सुधारणा आवश्यक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 August 2021

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्‌सवर आज भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. शार्दुल ठाकूर जखमी झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी अश्विनच्या नावाची चर्चा होती, पंरतु वेगवान गोलंदाजाला संधी दिली जाईल असे विराटने स्पष्ट केले.

लंडन - क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्‌सवर आज भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. शार्दुल ठाकूर जखमी झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी अश्विनच्या नावाची चर्चा होती, पंरतु वेगवान गोलंदाजाला संधी दिली जाईल असे विराटने स्पष्ट केले. मात्र विराट कोहलीच्या संघाला फलंदाजीत मोठी सुधारणा करावी लागणार आहे.

अखेरच्या दिवशी पावसामुळे पहिल्या कसोटीचा अंतिम दिवसाचा खेळ वाया गेला. भारताला १५७ धावांची गरज होती; तर इंग्लंडला नऊ विकेटची. विजयाची अधिक संधी भारताला होती, परंतु फलंदाजीबाबत झाकली मूठ सव्वा लाखाचीच राहिली होती. हा बोध घेत संघातील मधल्या फळीच्या फलंदाजांना जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे. त्यासाठी चेतेश्वर पुजारा, स्वतः विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना धावा कराव्याच लागणार आहेत.

लॉर्डसच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच निर्णय घेतला जाईल. विराटने जर चार वेगवान गोलंदाजांच्या रचनेला प्राधान्य दिले, तर ईशांत शर्मा किंवा उमेश यादव संघात येतील. ४+१ या रचनेने आम्ही दुसऱ्या कसोटीत खेळू, असे सूचक विधान कोहलीने पहिल्या कसोटीनंतर केले होते.

हिरवीगार खेळपट्टी अपेक्षित
लंडनमध्ये सध्या कमीत कमीत १४ आणि जास्तीत जास्त २४ अंश सेल्सिअस असे हवामान आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर दडपण टाकण्यासाठी खेळपट्टीवर हिरवे गवत अपेक्षित आहे. २०१८ मध्ये झालेल्या कसोटीत भारताचे दोन डाव दोन दिवसांत आटोपले होते, पण भारताकडेही तेवढाच भेदक वेगवान मारा आहे याचा विचारही इंग्लंड संघव्यवस्थापन निश्चितच करत असेल.

इंग्लंडला दुखापतीची चिंता
एकीकडे इंग्लंड ‘ग्रीन टॉप’चा विचार करत असले, तरी त्यांना प्रमुख गोलंदाजांच्या दुखापतींचाही विचार करावा लागणार आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडने तातडीने मार्क वूड आणि सादिक महम्मदचा समावेश केला आहे. 

इंग्लंड संघातही बदलाची शक्यता आहे. सलामीवीर रॉरी बर्न्सऐवजी हसीब हमीदला संधी मिळण्याची चर्चा आहे. भारतीय संघाविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.

दोन्ही संघांना दंड
पहिला कसोटी सामना निकाली झाला नसला, तरी त्याचा फटका भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांना बसला आहे. संपूर्ण सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे आयसीसीने दोन्ही संघांवर प्रत्येकी २० टक्के सामना मानधन कपातीची कारवाई तर केलीच आहे, परंतु कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील एकेक गुण कमी केला आहे. अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी असे एकेक गुण महत्त्वाचे ठरत असतात. ऑस्ट्रेलियाने अशीच चूक भारताविरुद्धच्या सिडनीतील कसोटीत केली होती. त्यांचा एक गुण कमी झाला होता. परिणामी त्यांच्याऐवजी न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली होती.


​ ​

संबंधित बातम्या