2011 चा वर्ल्ड कप जिंकून उपकार केले नाहीत : गौतम गंभीर

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 1 April 2021

पण वर्ल्ड कप जिंकला याला आता दहा वर्षे होत आली तरीही लोक या जुन्या आठवणीसंदर्भात उत्सुक का असतात?

भारतीय संघाने 2011 चा वर्ल्ड कप (2011 World Cup) जिंकण्याची दशकपूर्ती होत आहे. 2 एप्रिल 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकला होता. 28 वर्षानंतर भारतीय संघाला दुसऱ्या वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात गौतम गंभीरने सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने फायनल सामन्यात 97 धावांची खेळी केली होती. दशकपूर्तीच्या एक दिवस अगोदर गौतम गंभीरने  वर्ल्ड कपसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 

2011 च्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या आठवणीत हरवून जाण्यापेक्षा भविष्यात आपण काय करायचे याचा विचार व्हायला हवा, असे मत भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांनी मानले आहे. आपण वर्ल्ड कप जिंकला याला आता दहा वर्षे होत आली तरीही लोक या जुन्या आठवणीसंदर्भात उत्सुक का असतात? असा प्रश्नही गंभीर यांना पडला आहे.  

IPL मध्ये 7 वर्षानंतर चान्स मिळाल्यावर पुजाराने बदलला स्टान्स

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये गंभीर म्हणाले की, ही कालची गोष्ट नाही. किमान मला तरी असे वाटत नाही. या गोष्टीला आता 10 वर्षे झाली आहेत. हा क्षण निश्चितच अभिमानास्पद होता. पण आता या गोष्टीतून बाहेर येऊन पुढचा वर्ल्ड कप जिंकण्याची वेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा अधिक धावा करणाऱ्या गंभीर यांनी आमच्यावर जी जबाबदारी देण्यात आली होती ती आम्ही बजावली, असे सांगत वर्ल्ड कप जिंकून आम्ही काही उपकार केले नाहीत, असेही म्हटले आहे.   

IPL 2021: एबी 'बायो-बबल'मध्ये तर कोहली क्वारंटाईन

2011 मध्ये आम्हाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठीच संघात स्थान देण्यात आले होते. केवळ स्पर्धेत खेळण्यासाठी आम्हाला निवडले नव्हते. आम्ही जिंकण्यासाठी उतरलो आणि जिंकलोही. हा क्षण अभिमानास्पद होता. पण आता पुन्हा पुन्हा या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा पुढील वर्ल्ड कप जिंकण्याच्या दृष्टिने आपण प्रयत्न करायला हवे, असे मतही त्यांनी मांडले.
 


​ ​

संबंधित बातम्या