'पंतशिवाय भारतीय संघाची कल्पनाही करु शकत नाही"

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 29 March 2021

इंग्लंड दौऱ्यातही त्याने जेव्हा संधी मिळाली तेव्हा आपल्यातील उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज सध्याच्या घडीला चांगलाच फॉर्ममध्ये दिसतोय. धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जाणाऱ्या पंतच्या परिपक्वतेसंदर्भात यापूर्वी अनेक चर्चा रंगल्याचे ऐकायला मिळाले. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने आपल्यातील क्षमता दाखवून देत मॉडर्न क्रिकेटच्या जमान्यात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. इंग्लंड दौऱ्यातही त्याने जेव्हा संधी मिळाली तेव्हा आपल्यातील उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. 
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने सातत्याने चांगली खेळी करुन आपल्याकडे लक्ष वेधले.

इंग्लंडचे माजी फलंदाज इयान बेल यांना त्याने चांगलेच प्रभावित केले आहे. पंत दुर्मिळ प्रतिभावंत खेळाडूंपैकी एक आहे, असे मोठे वक्तव्य बेल यांनी केले आहे. एवढेच नाही तर पंतशिवाय मर्यादित षटकात भारतीय संघाची कल्पना अशक्य आहे, असे विधान त्यांनी केले आहे. पंतने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत संघात कमबॅक केले. दोन्ही सामन्यात त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली.  

धोनीसोबत लढवय्या सॅम कुरेनचा फोटो का होतोय व्हायरल?

पंतसंदर्भात बेल म्हणाले की, ‘ त्याच्याशिवाय मी भारतीय संघाची कल्पनाच करु शकत नाही. तो भारतीय संघाचे उज्वल भविष्य असल्याचे भासते. क्रिकेट जगतातील मोजक्या प्रतिभावंत खेळाडूंच्या पक्तींत जाण्याच्या दिशेने त्याने आपला प्रवास सुरु केलाय. काही मोजक्या खेळाडूंकडे जे कौशल्य असते तेच पंतकडेही असल्याचे वाटते. तो मॅच विनर खेळाडू आहे, असे बेल यांनी म्हटले आहे.  

पंतने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात 97 आणि नाबाद 89 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ कसोटी मालिका जिंकेल असा विचार कोणीच केला नव्हता. पण पंतने 'मॉडर्न क्रिकेटर्स की सोच' दाखवून देत भारतीय संघाच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला होता.  रविवारी पुण्यातील मैदानात विराट कोहली आणि लोकेश राहुल ही जोडी स्वस्तात माघारी फिरल्यानंतर खांद्यावर पडलेली जबाबदारी लिलया पेलत पंतने  62 चेंडूत 78 धावांची खेळी केली होती. इंग्लंड विरुद्धची मालिका पंतसाठी सर्वोत्तम ठरली. तीन प्रकारात त्याने चांगला खेळ दाखवला. तो इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत परपक्व फलंदाजाप्रमाणे खेळला, असे इयान बेल यांनी म्हटले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या