IPL 2021 Auction :लिलावापूर्वीच CSK अर्धा डझनहून अधिक खेळाडूंना देणार नारळ

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्जकडे नवे खेळाडू घेण्यासाठी केवळ 0.15 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळेच टीम मॅनेजमेंटने काही खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2021 Auction : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021) च्या नव्या हंगामासाठी प्रत्येक टीम संघ बांधणीच्या तयारी लागले आहेत. बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानंतर फ्रँचायझी खेळाडू अदला बदलीचा विचार करत असून ज्या खेळाडूंची कामगिरी निराशजनक आहे त्यांना रिलीज करण्याची तयारीही सुरु आहे. 

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स पाठोपाठ यशाच्या शिखरावर दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नईच्या ताफ्यात आगामी हंगामात मोठा बदल दिसण्याचे संकेत मिळत आहेत. लिलावापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाचे व्यवस्थापन 7 ते 8 जणांना नारळ देण्याची तयारी करत आहे. यात काही प्रमुख खेळाडूंचा समावेश असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे.  

4 जानेवारीला झालेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीत फ्रँचायझी संघाना खेळाडू अदला-बदली आणि खेळाडूंना रिलीज करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली होती. 21 जानेवारीपर्यंत संघानी यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करावी, असे सांगण्यात आले होते.  'इनसाइडस्पोर्ट्स'च्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स 7-8 खेळाडूंना रिलीज करणार आहे. यात केदार जाधव, हरभजन सिंह, ड्वेन ब्राबो, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, पीयूष चावला यासारख्या दिग्गजांची नावे आहेत. जर हे वृत्त खरे निघले तर नव्या वर्षात पिवळ्या जर्सीची धमक दाखवून देण्यासाठी टीम नव्या चेहऱ्यासह मैदानात उतरल्याचे दिसू शकते. नव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.   

AusvsInd : आरे बाबांनो ऑस्ट्रेलियासोबत रन आउटची स्पर्धा कशाला? जाणून घ्या रेकॉर्ड

या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्जकडे नवे खेळाडू घेण्यासाठी केवळ 0.15 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळेच टीम मॅनेजमेंटने काही खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये युएईत रंगलेल्या आयपीएलमध्ये निराशजनक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना यात समावेश असल्याचे समजते. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ पहिल्यांदाच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले होते. या स्पर्धेनंतर धोनीच्या नेतृत्वाखालीच संघ आगामी स्पर्धेत उतरणार हे स्पष्ट झाले होते. मात्र नव्या खेळाडूंसह टीम बांधणी केली जाईल, अशी चर्चाही रंगली होती.  

या खेळाडूंच्या यादीत रैनाचे नाव असणार का? याकडेही सर्वांचे लक्ष असेल. धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर रैनाने युएईत रंगलेल्या स्पर्धेत अचानक माघार घेतली होती. संघ व्यवस्थापन आणि त्याच्यात काही वाद झाल्याचेही बोलले गेले. त्यामुळे तो संघाचा भाग असणार का? त्याला पुन्हा संधी मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या