मनसेनं 'स्टार स्पोर्ट्स'ला झुकवलं; IPL कॉमेंट्रीविषयी झाला मोठा निर्णय

सकाळ स्पोर्ट्स
Monday, 15 March 2021

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयपीएलची कॉमेंट्री (समालोचन) मराठी भाषेमध्ये सुरू करण्यासंदर्भात इशारा दिला होता.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयपीएलची कॉमेंट्री (समालोचन) मराठी भाषेमध्ये सुरू करण्यासंदर्भात इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर स्टार स्पोर्ट्सनं अधिकृतरित्या पत्र लिहित आपण यंदाच्या आयपीएलपासून मराठी भाषेचा समावेश करणार असल्याचं मनसेला कळवलं आहे. इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावे यासाठी मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवलं आहे. मनसेच्या या इशाऱ्यानंतर आता स्टार इंडिया समुहाने मागणी मान्य केली आहे. याचे पत्र स्टार इंडियाने मनसेला पाठवले आहे.

आयपीएल सामन्यांचे मराठीत समालोचन व्हावे, यासाठी नोव्हेंबर 2020 मध्ये मनसे पक्षातर्फे पाठपुरावा सुरू केला होता. हिंदी, इंग्रजी, तेलगू, कानडी आणि बंगाली अशा भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन होते, मग मराठीत का नाही? यासाठी आम्ही स्टार इंडिया समुहाकडे पाठपुरावा सुरू केला होता. कोरोनामुळे ही मागणी पूर्ण होण्यासाठी काही उशीर झाला. मात्र शेवटी त्यांनी आमची मागणी मान्य करत पत्र लिहिलेले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मराठी भाषेचा समावेश केलेला आहे, असे या पत्र सांगितले आहे. मराठी क्रीडा वाहिनीदेखील सुरू व्हावी, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे असे मनसेचे केतन नाईक यांनी सांगितले.

जरूर वाचा- Ind vs Eng: 'कॅप्टन' कोहली नावाप्रमाणेच विराट; केला धोनीलाही न जमलेला विक्रम

केतन नाईक यांनी ट्विट करत, आता मराठीतून समालोचन ऐकायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे. 'मराठीचा सन्मान, मराठीचा जागर, यंदाची IPL स्टार वर मराठी कॉमेंटरी!', असं ट्विट नाईक यांनी केलं आहे.

भारत-इंग्लंड टी२० सामन्याच्या रंजक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

दरम्यान, आयपीएल २०२१ चा थरार ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या हंगामाचे सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरत होणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या