आयपीएल संघ, करमुक्तीवर निर्णय? 

शैलेश नागवेकर
Wednesday, 23 December 2020

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधार सभा 

अहमदाबाद :  कोरोना आणि लॉकडाऊननंतर बीसीसीआयची ऑनलाईन नसलेली पहिली महत्त्वाची बैठक उद्या होत आहे. आयपीएलचे संघ वाढणार का? विश्‍वकरंडक स्पर्धेच्या नियोजनासाठी करमुक्ती तसेच विविध समित्यांवर या वार्षिक सर्वसाधरण सभेत चर्चा होणार आहे. या वार्षिक सभेतून नवे नियुक्त उपाध्यक्ष राजीव शुक्‍ला अधिकृतपणे जबाबदारी स्विकारतील. तर ब्रिजेश पटेल आयपीएलच्या प्रशासन समितीचे प्रमुखपदी कायम रहाण्याचाही निर्णय होणार आहे. 

गांगुलींना विचारणा? 
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली सध्या एका ब्रॅंडचे प्रमोशन करत आहेत. व्यावसायिक हितसंबंधांच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली, परंतु या नियमात स्पष्टता नसल्यामुळे उद्याच्या या सभेत त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण विचारले जाण्याची शक्‍यता कमी आहे. 

आयपीएलमध्ये किती संघ? 
पुढील आयपीएल किती संघांची होणार यावर अनेक तर्कवितर्क करण्यात आले. बीसीसीआयकडूनही दोन अधिक संघांचे अप्रत्यक्षपणे सूतोवाच करण्यात आलेले होते. उद्याच्या या सभेत यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. बीसीसीआय 10 संघांसाठी उत्सुक आहे, परंतु नव्या संघासाठी निविदा, खेळाडूंचा लिलाव यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे यंदाची आयपीएल आठच संघांची ठेवण्याचाही निर्णय होऊ शकतो. 2022 पासून 10 संघांची आयपीएल होऊ शकते. दोन संघ वाढल्यास सामन्यांची संख्या 94 पर्यंत असू शकेल. 

वर्ल्डकपसाठी करमुक्ती 
वर्ल्डकपसारख्या स्पर्धेचे यजमानपद देताना आयसीसी त्या त्या देशांकडून करमुक्तीची मागणी करत असते. त्याप्रमाणे ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीही करमुक्ती मिळण्यासाठी त्यांनी बीसीसीआयवर दबाव टाकला आहे. यासंदर्भात उद्याच्या सभेत पुढील कार्यवाही करण्याबात रूपरेषा ठरू शकेल. ही स्पर्धा भारतात होऊ शकली नाही तर दुबईला स्थलांतरित होण्याचीही शक्‍यता आहे. 

उपसमित्यांची नियुक्ती 
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बीसीसीआयच्या बहुतांशी कामाला ब्रेक लागला होता, त्यामुळे विविध समित्या आणि उपसमित्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. उद्या सर्व समित्यांच्या नियुक्‍त्या होऊ शकतात.


​ ​

संबंधित बातम्या