इरफानही कोरोनाच्या जाळ्यात, इंग्लंड विरुद्धच्या वनडेत केली होती कॉमेंट्री 

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 30 March 2021

इरफान पठाण याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या इरफान पठाणलाही कोरोनाची लागण झाली आहे. सर्वात पहिल्यांदा या स्पर्धेत इंडिया लिजेंड्सचे नेतृत्व केलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सचिनच्या संपर्कातील युसूफ पठाण आणि एस ब्रद्रिनाथ यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. यात आता इरफान पठाणचाही समावेश झालाय. देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना क्रिकेटच्या स्पर्धेत एकाच टीममध्ये खेळलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त धक्कादायक असेच आहे. इरफान पठाण इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात आकाश चोप्रासोबत समालोचन करतानाही पाहायला मिळाले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. 

इरफान पठाण याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षण असल्यामुळे कोविड 19 टेस्ट केली.  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्याच्या घडीला घरीच क्वारंटाईन असल्याचेही त्याने पोस्टमधून सांगितले आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोनाची चाचणी करावी, असे आवाहनही इरफान पठाण याने केले आहे. 

INDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज​

ड्रेसिंग रूममध्ये सचिनसोबत घालवला होता वेळ

मागील वर्षी कोरोनामुळे स्थगित झालेली रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धा छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये नुकतीच पार पडली. श्रीलंका लिंजेंड्सला नमवून सचिनच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्सने ही स्पर्धा जिंकली होती. 21 मार्च रोजी फायनलच्या सामन्यापूर्वी 16 मार्च रोजी ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडू सचिनसोबत एकत्रित जमले होते. मास्टर ब्लास्टरच्या 100 शतकांचा दिवस साजरा करण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये सचिनच्या हस्ते केक कापण्यात आला होता. यावेळी इरफान पठाण, युवराज, यूसुफ, मोहम्मद कैफ आणि प्रज्ञान ओझा सह अन्य खेळाडूही उपस्थितीत होते.  

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजवर प्रश्नचिन्ह 

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज ही एक स्वतंत्र स्पर्धा आहे. या स्पर्धेला बीसीसीआयची मंजूरी नव्हती. या स्पर्धेत निवृत्ती घेतलेले खेळाडू खेळताना दिसले होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही आयोजकांनी प्रेक्षकांना सामन्यासाठी एन्ट्री दिली होती. सामना पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक मास्क घालत नव्हते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा नियमही विसरल्याचे चित्र  पाहायला मिळाले होते. यावरुन आता या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.  


​ ​

संबंधित बातम्या