पाक महिला संघ जावेरियाच्या नेतृत्वाखाली परदेशात खेळणार

सकाळ स्पोर्टस् ऑनलाइन टीम
Friday, 1 January 2021

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाकिस्तानी महिला संघ तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची नियमित कर्णधार बिस्माह मारुफ हिने कौटुंबिक कारणास्तावर आगामी दक्षिण आफ्रिकेतून माघार घेतली आहे. तिच्या अनुपस्थितीत पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व हे जावेरिया खान हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या   निवड समितीच्या प्रमुख मुमताज यांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाकिस्तानी महिला संघ तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी 17 सदस्यीय पाकिस्तानी संघाची घोषणा करण्यात आली. पाकिस्तानी संघ न्यूझीलंडमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या विश्व चषक स्पर्धेचीही तयारी करत असल्याची माहिती मुमताज यांनी दिली. 

2010 पासून संघाबाहेर असलेल्या 28 वर्षीय अष्टपैलू  कायनात इम्तियाज हिला देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर संघात स्थान देण्यात आली आहे.  दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी 27  महिला खेळाडू जैविक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत कराचीमध्ये सराव करण्याची शक्यता आहे. 10 महिन्यानंतर पाकिस्तानी महिला संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.  

AUSvsIND : सिडनी कसोटीवर पुन्हा कोरोनाचे संकट

निवड झालेले खेळाडू कराचीमध्ये वास्तव्यास असतील. 11 जानेवारीला महिला खेळाडूंचा ताफा डर्बनच्या दिशने रवाना होतील. दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर 13 जानेवारीला सराव सामन्याला सुरुवात होईल. 20 जानेवारीपासून वनडे सामन्याने पाकिस्तानी महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होईल. 3 फेब्रुवारीला टी-20 मालिकेने पाकिस्तानी महिला संघ दौऱ्याचा समारोप करेल.

वनडे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानी महिला संघ 

जावेरिया खान (कॅप्टन), ऐमन अन्वर, आलिया रियाज, अनम अमीन, आयशा नसीम, आयशा जफर, डायना बेग, फातिमा सना, कायनात इम्तियाज, मुनीबा अली सिद्दीकी, निदा खान, नाशरा संधू, निदा डार, ओमाएमा सोहेल, सादिया इकबाल, सिदरा नवाज आणि सय्यद आरुब शाह. 


​ ​

संबंधित बातम्या