विराटनं मोडला मुंबईकर रोहितचा मोठा विक्रम

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 15 March 2021

७३ धावांची खेळी करणाऱ्या कोहलीनं टी-२० मधील रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.  

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा सात गड्यांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं पाच सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.  विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशनच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं मालिकेत पुनरागमन केलं.  या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं नाबाद ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या सामन्यात ७३ धावांची खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीनं टी-२० मधील रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.  
 
पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकणाऱ्या कोहलीने या सामन्यात विजयात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. विराट कोहलीने ४९ चेंडूत ५ चौकार व तीन षटकारांच्या मदतीनं ७३ धावांची खेळी केली. यासह विराट कोहलीनं रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा (२६ वेळा) करणारा फलंदाज बनला आहे. तर रोहित (२५ वेळा) दुसऱ्या स्थानावर आला आहे.

सर्वाधिक ५०+ अधिक धावा करणारे फलंदाज
१) विराट कोहली - (२६ वेळा, भारत)
२) रोहित शर्मा- (२५ वेळा, भारत)
३) डेविड वॉर्नर- (१९ वेळा, ऑस्ट्रेलिया)
४) मार्टिन गप्टील- (१९ वेळा, न्यूझीलंड)
५) पीआर स्टरलींग- (१८ वेळा, आयर्लंड)
६) बाबर आजम- (१६ वेळा, पाकिस्तान)
७) आरोन फिंच - (१६ वेळा,ऑस्ट्रेलिया)
८) ख्रिस गेल- (१५ वेळा, वेस्ट इंडिज)
९) ब्रेंडन मक्युलम- (१५ वेळा, न्यूझीलंड)
१०) केएल राहुल -(१४ वेळा, भारत)

विराट कोहली 'तीन हजारी' मनसबदार
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज बनला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला हे मानाचे स्थान मिळवता आलेले नाही. विराट कोहलीच्या नावावर आता ३००१ धावा आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराटनंतर सर्वाधिक धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल दुसऱ्या स्थानावर आहे. गप्टिलच्या अगदी पाठोपाठ भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आहे. मार्टिन गप्टिलने २८३९ धावा केल्या आहेत तर रोहित शर्माने २७७३ धावा केल्या आहेत.
 


​ ​

संबंधित बातम्या