मिताली राज पुन्हा अव्वल नंबरी फलंदाज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 July 2021

इंग्लंडविरुद्धच्या सलग तीन एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतके करणारी भारताची कर्णधार मिताली राज महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे.

लंडन - इंग्लंडविरुद्धच्या सलग तीन एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतके करणारी भारताची कर्णधार मिताली राज महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे. २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत मितालीने आठव्यांदा हा सन्मान मिळवला आहे. या अगोदर २०१८ मध्ये ती अव्वल क्रमांकावर होती. 

इंग्लंडविरुद्धची ही मालिका सुरू झाली तेव्हा मिताली आठव्या स्थानावर होती. पहिल्या सामन्यात ७२ धावांची खेळी केल्यानंतर ती पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आली. तीन सामन्यांच्या या मालिकेत तिने २०६ धावा केल्यानंतर पहिल्या स्थानावर विराजमान झाली.

मितालीने अव्वल स्थानावर येण्याचा पराक्रम २००५ मध्ये पहिल्यांदा केला होता. त्या वेळी झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत तिने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ९१ धावांची खेळी केली होती. १६ वर्षांनंतरही तिने पुन्हा हा सन्मान मिळवला आहे, हासुद्धा एक विक्रमच आहे. 

इंग्लंडची जेनेटी ब्रिटेन १९८४ मध्ये पहिल्यांदा आणि १९९५ मध्ये पुन्हा; तर न्यूझीलंडची डेही हॉक्ले १९८७ मध्ये पहिल्यांदा आणि १९९७ मध्ये पुन्हा अव्वल नंबरी फलंदाज ठरली होती. १६ वर्षांनंतर आपले वर्चस्व मितालीलाच कायम राखता आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या