Target_2021 : "झिरोपासून 'स्टार्ट' करावा लागणार नाही हे निश्चित"

सकाळ स्पोर्टस् ऑनलाइन टीम
Friday, 1 January 2021

कोरोनाकाळातील त्रास व निराशा झटकून मी आता घरगुती क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे. या सामन्यांमध्ये अधिकाधिक धावा काढून भारतीय संघात 'कमबॅक' करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. 
-मोना मेश्राम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

नागपूर : कोरोनामुळे अचानक लॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीला एक- दोन महिने खूप त्रास झाला. मात्र त्यानंतर हळूहळू सवय झाली. या काळात फिटनेसवर अधिकाधिक भर देऊन स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. आता परिस्थिती 'नॉर्मल' होऊ लागल्याने मैदानावर हलका सराव सुरू केला आहे. त्यामुळे घरगुती सामन्यांमध्ये धावा काढून भारतीय संघात 'कमबॅक' करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे, मध्य रेल्वेत कार्यरत असलेली विदर्भाची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू मोना मेश्राम हिने म्हटले आहे. 

कोरोनाकाळातील अनुभव 'सकाळ'सोबत शेअर करताना मोना म्हणाली, इतर खेळाडूंप्रमाणे मलाही कोरोनाचा फटका बसला. एरवी प्रॅक्टिस व स्पर्धांच्या निमित्ताने कित्येक दिवस बाहेर राहावे लागायचे. कोरोनामुळे पहिल्यांदाच इतके दिवस घरात कोंडून राहावे लागले. त्यामुळे आणखी अस्वस्थ वाटायचे. लॉकडाउनमध्ये क्रिकेटची बॅटसुद्धा हाती घेता आली नाही. केवळ फिटनेसवरच भर दिला. शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वतःला कसे फिट ठेवता येईल, याचाच अधिकाधिक विचार केला. कारण फिट राहिली तरच शंभर टक्के योगदान देऊ शकेल असे मला वाटायचे. परिस्थितीची सवय करून घेतल्याने नंतर फारसा त्रास झाला नाही. सुदैवाने बीसीसीआयने झूम कॉलवर कोचेस व सायकॉलॉजिस्टची मदत उपलब्ध करून दिल्याने त्या माध्यमातून स्वतःच्या चुकांवर 'वर्क' करता आले. 

टीम इंडियाच्या महिला खेळाडूंना पाहावी लागणार वाट; ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलला!

सरकारने सोशल 'डिस्टन्सिंग'च्या अटींवर प्रॅक्टिसला परवानगी दिल्यानंतर गेल्या एक-दीड महिन्यांपासून मैदानावर जात आहे. स्वतःची काळजी घेत माधव बाकरे सरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सराव सुरू आहे. त्यामुळे जेव्हाकेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा झिरोपासून 'स्टार्ट' करावा लागणार नाही हे निश्चित आहे. कोरोनामुळे एक चांगलीही गोष्ट झाली. या निमित्ताने का होईना कुटुंबीयांना भरपूर वेळ देता आला. बऱ्याच दिवसानंतर इतके दिवस सर्वांसोबत राहण्याची संधी मिळाली. शिवाय नवनवीन डिशेससुद्धा बनवायला शिकले. भविष्यातील स्पर्धांबद्दल विचारले असता मोना म्हणाली, सध्यातरी याबाबत काहीच सांगू शकत नाही. बीसीसीआयकडून अद्याप काहीही आले नाही. जेव्हाकेव्हा स्पर्धा होईल, तेव्हा त्यात अधिकाधिक धावा काढून भारतीय संघात 'कमबॅक' करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. घरगुती सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्यास नक्कीच पुनरागमनाचा 'चान्स' आहे. त्यादृष्टीनेच मी मेहनत करीत आहे. 

एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या व अभ्यंकरनगरात दहा बाय दहाच्या घरात राहणाऱ्या मोनाने गरिबी व विपरीत परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. जून २०१२ मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मोनाला गेल्या आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीदरम्यान भारतात २०१३ मध्ये आणि इंग्लंडमध्ये २०१७ साली झालेल्या आयसीसी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. दोन विश्‍वकरंडकात भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती विदर्भाची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. शिवाय श्रीलंकेतील टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतही खेळण्याची तिला संधी मिळाली. मोनाला सर्वोत्तम कामगिरीसाठी बीसीसीआयने २०११ मध्ये "बेस्ट ज्युनिअर क्रिकेटर' पुरस्काराने सन्मानित केले होते. 

शब्दांकन: नरेंद्र चोरे 

  


​ ​

संबंधित बातम्या