न्यूझीलंड ‘चॅम्पियन’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 June 2021

आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये लंडनमध्ये आजच्या दिवशी (२३ जून) महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते.

साऊदम्टन - आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये लंडनमध्ये आजच्या दिवशी (२३ जून) महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. आठ वर्षांनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पराभव झाला. सर्वच बाबतीत नियोजनबद्ध खेळ करणारे न्यूझीलंड प्रथमच चॅम्पियन्स ठरले.

ज्या खेळपट्टीवर न्यूझीलंड फलंदाज निर्धाराने फलंदाजी करत होते तेथे भारतीय फलंदाजांनी शरणागती स्वीकारली. कालच्या २ बाद ६४ वरून भारताचा दुसरा डाव १७९ धावांत संपला. अवघ्या ४३ षटकांत फलंदाजांचा खेळ खल्लास झाला. त्यानंतर विजयासाठी मिळालेले ५३ षटकांतील १३९ धावांचे आव्हान न्यूझीलंडने अतिशय सावध फलंदाजी करत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले. अश्विनने सलामीवीरांना बाद केल्यावर विल्यम्सन आणि टेलर यानी नाबाद ९६ धावांची भागीदारी करून विजय सोपा केला.

विजय नाही, पण हा सामना किमान अनिर्णित ठेवण्याची संधी भारताला होती, काल दोन फलंदाज बाद झालेले असले तरी आज सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जाणारा विराट कोहली आणि भरभक्कम बचावासाठी नावाजलेला चेतेश्वर पुजारा मैदानात होते, पण एकाकडेही आत्मविश्वास नव्हता. अर्ध्या तासाचा खेळ होत नाही तोच हे दोघेही फलंदाज बाद झाले. विराटला तर आयपीएलमध्ये त्याच्या बंगळूर संघातून खेळणाऱ्या जेमिन्सनने दुसऱ्या डावातही बाद केले. पुजाराचीही विकेट त्यानेच काढली आणि भारताच्या डावाला भगदाड पडले. 

उपकर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला गरज असताना पुन्हा एकदा निराशा केली. पाठीमागच्या चेंडूवर त्याने विकेट गमावल्यापेक्षा बहाल केली. भारताने निम्मा संघ १०९ धावांत गमावला. 

न्यूझीलंडचे डावपेच 
न्यूझीलंडचा संघ भारताच्या प्रत्येक फलंदाजांसाठी काटेकोर योजनांनी मैदानात उतरला होता. डावखुरा रिषभ पंत, रवींद्र जडेजा यांच्या विरोधात डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनर आखूड टप्प्याचा मारा करत होता. त्यात जडेजा फसला. रिषभ पंतने भल्या ४१ धावा केल्या, पण तो कधीही बाद होईल असेच चित्र होते. अखेर खराब फटका मारून त्यानेही विकेट बहाल केली. त्याअगोदर अश्विन उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूवर फसला. महम्मद शमीने तीन चौकारांसह १३ धावा केल्या, पण ईशांत शर्मा आणि बुमरा यांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. 

संक्षिप्त धावफलक -
भारत, पहिला डाव - २१७. न्यूझीलंड, पहिला डाव - २४९ 
भारत, दुसरा डाव - ७३ षटकांत सर्वबाद १७० (रोहित शर्मा ३०, शुभमन गिल ८, चेतेश्वर पुजारा १५, विराट कोहली १३, अजिंक्य रहाणे १५, रिषभ पंत ४१, रवींद्र जडेजा १६, आर. अश्विन ७, महम्मद शमी १३, ईशांत शर्मा १, जसप्रित बुमरा ०, टीम साऊदी ४८-४, टेंट्र बोल्ट ३९-३, कॅली जेमिन्सन ३०-२).
न्यूझीलंड, दुसरा डाव - ४५.५ षटकांत २ बाद १४० (केन विल्यम्सन नाबाद ५२,  रॉस टेलर नाबाद ४७, अश्विन १७-२)

लक्षवेधक

  • १ ते १३९ धावांचे लक्ष्य यापूर्वी कसोटीच्या चौथ्या डावात ४०४ वेळा होता. त्यात धावांचा पाठलाग करणारा संघ ३७८ वेळा विजयी, पण १६ वेळा पराजित
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील गेल्या तीन कसोटीत किवी किमान ११४ धावा करीत होते, तर भारताच्या अखेरच्या पाच विकेटनी केलेल्या सर्वाधिक धावा ६४
  • साऊदम्प्टनच्या जगज्जेतेपद कसोटी लढतीत भारताच्या अखेरच्या पाच विकेटनी ६१ धावा केल्या, तर किवींच्या अखेरच्या पाच विकेटनी पहिल्या डावात ११४ धावा केल्या
  • जसप्रीत बुमराचा दोन्ही डावात भोपळा. सहकारी सर्व फलंदाज दोन्ही डावात धावा करीत नसताना एका भारतीय फलंदाजाने चष्मेबद्दूर होण्याची ही दुसरी वेळ. यापूर्वी अजित आगरकर (मेलबर्न, १९९९)
  • बुमराने भारतीय फलंदाजाचा एक हजारावा भोपळाही नोंदवला.

न्यूझीलंड विश्वकरंडकात

  • एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत दोनदा उपविजेते, याशिवाय सहावेळा उपांत्य फेरी
  • विश्वकरंडक ट्वेटी २० स्पर्धेत दोनदा उपांत्य फेरी
  • न्यूझीलंडने दुसऱ्यांदा आयसीसीची स्पर्धा जिंकली. यापूर्वी २००० च्या केनियातील चॅम्पियन्स करंडक अंतिम लढतीत भारताचा चार विकेटनी पराभव
  • २००९ च्या चॅम्पियन्स स्पर्धेत उपविजेतेपद

​ ​

संबंधित बातम्या