कॅप्टन्सीची नो वॅकन्सी; स्मिथच्या 'बोलंदाजी'नंतर कोचची फटकेबाजी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 31 March 2021

2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात स्टीव्ह स्मिथ दोषी आढळला होता. यानंतर त्याने कॅप्टन्सी गमावली.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या नेतृत्वासाठी आघाडीला नाव असलेल्या स्टीव्ह स्मिथला ठेंगा मिळाला. त्याच्याऐवजी युवा पंतकडे दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व दिले. या घडामोडींसोबतच स्टीव्ह स्मिथने एका  मुलाखतीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे पुन्हा नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. संघाच्या नेतृत्वासंदर्भातील या घडामोंडीमुळे स्टीव्ह स्मिथ सध्या चर्चेत आहे. एका बाजूला दिल्ली कॅपिटल्सने त्याला डावलून पंतकडे जबाबदारी सोपवली. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच जस्टीन लँगर यांनी राष्ट्रीय संघात कॅप्टन्सीची जागा नाही, म्हणत स्टीव्ह स्मिथचे स्वप्न सत्यात उतरणार नसल्याचे संकेत दिले आहेत.  

2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात स्टीव्ह स्मिथ दोषी आढळला होता. यानंतर त्याने कॅप्टन्सी गमावली. एवढेच नाही तर त्याला एक वर्षाच्या बंदीचाही सामना करावा लागला. जर संधी मिळाली तर पुन्हा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्यास तयार आहे, अशी इच्छा स्मिथने एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवली. काही तासांच्या आतच यावर ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच जस्टिन लँगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

स्मिथने 'न्यूज कॉर्प'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला होती की, मी खूप विचार केल्यानंतर नेतृत्व करण्याची मनस्थिती तयार केली आहे. जर संधी मिळाली तर निश्चितच मी कर्णधार म्हणून काम करण्यास तयार असेन. त्याच्या या वक्तव्याची चर्चा रंगत असताना लँगर यांनी या मुद्यावर भाष्य केले. सध्याच्या घडीला नेतृत्व बदलाची कोणतीही संधी ऑस्ट्रेलिया संघात उपलब्ध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

IPL 2021 : पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाचे ओझे

एबीसी स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, लँगर म्हणाले की आमच्याकडे दोन चांगले कॅप्टन आहेत. आगामी काळात आम्हाला अ‍ॅशेस आणि टी-20 वर्ल्ड कपसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धा खेळायच्या आहेत. संघाचे भविष्य उज्वल असून सध्याच्या घडीला नेतृत्वासाठी कोणतीही जागा नाही. ऑस्ट्रेलियात सध्या स्पिट कॅप्टन्सीचा प्रयोग पाहायला मिळतोय. कसोटी संघाचे नेतृत्व हे टीम पेन यांच्याकडे असून मर्यादीत षटकाच्या सामन्यात अ‍ॅरॉन फिंच ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. लँगर यांनी या दोघांच्या उपस्थिीत आता स्मिथला संधी मिळणार नाही, असेच संकेत दिले आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या