आता क्रिकेटही ऑलिंपिकमध्ये?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 August 2021

सर्व जगाच्या क्रीडा क्षेत्रावर आरूढ णाऱ्या ऑलिंपिकमध्ये आपल्याही खेळाचा पुन्हा समावेश व्हावा, यासाठी आयसीसी प्रयत्न करणार आहे. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे १२८ वर्षांनंतर पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

मुंबई - सर्व जगाच्या क्रीडा क्षेत्रावर आरूढ णाऱ्या ऑलिंपिकमध्ये आपल्याही खेळाचा पुन्हा समावेश व्हावा, यासाठी आयसीसी प्रयत्न करणार आहे. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे १२८ वर्षांनंतर पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयसीसी अथक प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत संघटना बीसीसीआयने पाठिंबा दर्शवला आहे. स्वायत्तता संपुष्टात येण्याच्या भीतीमुळे बीसीसीआयने अगोदर भारतीय ऑलिंपिक संघटनेशी संलग्न होण्यास नकार दर्शवला होता; पण आता क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश होण्यासाठी बीसीसीआयही आग्रही असल्याचे सचिव जय शहा यांनी सांगितले.

२०२८ मधील ऑलिंपिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसीने केवळ विचार मांडलेला नसून त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. कृती गटाची स्थापना लगेचच आयसीसीने केली आहे. केवळ एका ऑलिंपिकसाठी हा प्रयत्न नसून कायमस्वरूपी क्रिकेट ऑलिंपिकमध्ये राहण्यास आम्ही प्रयत्न करणार आहेत, असे आयसीसीचे कार्याध्यक्ष ग्रेग बार्ल्कले यांनी सांगितले. दक्षिण आशियामध्ये क्रिकेट अतिशय लोकप्रिय आहे. ९२ टक्के प्रेक्षक क्रिकेटचे चाहते आहेत. अमेरिकेतही ३ दशलक्ष क्रिकेट चाहते आहेत, या सर्व चाहत्यांना आपले हिरो ऑलिंपिकमध्ये खेळताना पाहायला आवडेल, असे बार्ल्कले म्हणाले. 

बहुविध स्पर्धांत समावेशाची सुरुवात
बहुविध खेळाच्या स्पर्धेत क्रिकेटचे पाऊल पडण्यास सुरुवात होत आहे. १९९८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटला स्थान होते. आता २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश असणार आहे.

बार्ल्कले यांच्याकडून टोकियोचे अभिनंदन
कोरोनाचे सावट चारही बाजूने असले, तरी टोकियो ऑलिंपिक यशस्वीपणे पार पाडणाऱ्या जपानचे बार्ल्कले यांनी अभिनंदन केले. सर्वप्रथम आम्ही आयसीसीच्या वतीने टोकियो २०२० स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक करतो. ऑलिंपिक गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश झाला, तर आम्हाला अधिकच आनंद होईल. आमच्यासह विश्वात खेळले जाणारे इतरही खेळ ऑलिंपिकमध्ये स्थान मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे बार्ल्कले म्हणाले.

२०२८ च्या ऑलिंपिक स्पर्धेत नव्या खेळांच्या समावेशाबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटना २०२४ मध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कृती गटाच्या अध्यक्षपदी इयन वॉटमोर
आयसीसीने स्थापन केलेल्या कृती गटाच्या अध्यक्षपदी इंग्लंड क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष इयन वॉटमोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह आयसीसीच्या स्वतंत्र संचालकपदाचा कार्यभार असलेल्या इंद्रा नूयी यांचा समावेश आहे. झिंबाब्वेचे तावेनग्वा मुकुहालानी, आशियाई क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष महिंदा वेलीपूर्णम, अमेरिका क्रिकेट संघटनेचे पराग मराठे यांनाही या कृती गटात स्थान देण्यात आले आहे.

ऑलिंपिकमध्ये कधी होते क्रिकेट 
१९०० च्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होता. इंग्लंडने फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते.


​ ​

संबंधित बातम्या