लॉर्ड्सवर रोहितचा दरारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 August 2021

एकदिवसीय असो वा ट्वेन्टी-२० ज्या सहजतेने रोहित शर्मा फलंदाजी करतो तशीच तो कसोटी सामन्यातही करत आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर आपला दरारा निर्माण करताना त्याने इंग्लिश गोलंदाजांना शरण आले.

लंडन - एकदिवसीय असो वा ट्वेन्टी-२० ज्या सहजतेने रोहित शर्मा फलंदाजी करतो तशीच तो कसोटी सामन्यातही करत आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर आपला दरारा निर्माण करताना त्याने इंग्लिश गोलंदाजांना शरण आले. त्याच्या ८३ धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी चहापानापर्यंत २ बाद १५७ अशी मजल मारली.

पावसाचा अंदाज नसताना आज लंडनमध्ये वरुणराज अधूनमधून अवतरत होते, पण त्यातून खेळ होत होता त्यात रोहित शर्मा बरसत होता. भारताच्या १०० धावांत रोहितच्या ७५ धावा होत्या आणि त्यात त्याने ११ चौकार आणि एक षटकारही मारला होता. त्याच  वेळी दुसरा सलामीवीर केएल राहुल १६ धावांवरच होता.

आज सकाळी पडलेल्या पावसामुळे खेळ अर्धा तास उशिरा सुरू झाला. हवामान ढगाळ असल्यामुळे इंग्लंड कर्णधार ज्यो रूटने नाणेफेक जिंकल्यानंतर भारतास प्रथम फलंदाजी दिली, परंतु चार वेगवान गोलंदाज असतानाही त्याला पहिल्या दोन सत्रांत ब्रेक थ्रू मिळाला नाही. उलट रोहितने खेळावर वर्चस्व मिळवले होते.

परिस्थिती सोपी नसल्यामुळे रोहित आणि राहुल यांची सुरवात संयमी होती, स्विंग आणि बाउंस यांचा अंदाज घेतल्यानंतर रोहितने आपल्या बॅटमधून धावांचे दरवाजे उघडले. त्याचे फटके नजाकतदार होतेच. डावाच्या १५ व्या षटकात त्याने सॅम करनला चार चौकार मारले तेथून त्याने गिअर बदलले. अर्धशतकात त्याचे आठ चौकार होते.

रोहितला रोखण्यासाठी मार्क वूडने काही आखूड चेंडू टाकले, परंतु रोहितने त्यातील एक चेंडू हुकचा फटका मारून प्रेक्षकांमध्ये भिरकावला. त्यानंतर रोहितने फिरकी गोलंदाज मोईन अलीला पुढे सरसावत चौकार मारून इंग्लंड संघात भीती निर्माण केली. रोहित शतक करणार असे वाटत असताना अँडरसनच्या एका आत आलेल्या चेंडूवर तो त्रिफाळाचीत झाला.

आशियाबाहेर शतकी सलामी 
रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी आज १२६ धावांची सलामी दिली. आशिया खंडाबाहेर ही ११ वर्षानंतर भारताची शतकी सलामी आहे. या अगोदर २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी १३७ धावांची सलामी दिली होती.


​ ​

संबंधित बातम्या