टीम इंडिया पाकिस्तानात खेळेल; PCB चं स्वप्न सत्यात उतरेल?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 March 2021

2022 ची स्पर्धा श्रीलंकेत होईल आणि त्यानंतर 2023 मध्ये भारताचा समावेश असलेली स्पर्धा आम्ही पाकिस्तानमध्ये आयोजित करू, यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंधही चांगले झालेले असतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

लाहोर : पाक लीग स्पर्धेदरम्यान त्यांच्याच खेळाडूंना झालेला कोरोना, त्याअगोदर भारताने कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निश्‍चित केलेले स्थान, यामुळे पाकिस्तानने जूनमध्ये अपेक्षित असलेल्या आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावर पाणी सोडले आहे. आता 2023 मध्ये आम्ही ही स्पर्धा घेऊ आणि त्यात भारताचा संघ पाकिस्तानमध्ये येऊन खेळेल, असे स्वप्न त्यांना पडू लागले आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष एहसान मनी यांनी यंदाच्या वर्षात पाकिस्तानमध्ये अपेक्षित असलेली स्पर्धा होणार नसल्याचे जाहीर केले. 2022 ची स्पर्धा श्रीलंकेत होईल आणि त्यानंतर 2023 मध्ये भारताचा समावेश असलेली स्पर्धा आम्ही पाकिस्तानमध्ये आयोजित करू, यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंधही चांगले झालेले असतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कठोर संबंधांचा बर्फ लवकरच वितळेल, भारतीय क्रिकेट संघ आमच्या देशात खेळायला आला तर ती मोठी घडामोड असेल, असे मनी यांनी पाकिस्तानमधील जंग या वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले.

INDvsENG ODI Squad : 'सूर्या'ची किरणं वनडेतही दिसणार; कृष्णालाही मिळाली 'प्रसिद्धी'
 

यंदाचा आशिया कप आयोजित करण्यास आता कालावधी नाही. मुळात कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या पाकिस्तान लीगचे सहा सामने शिल्लक आहेत. तसेच भारतीय संघही जून महिन्यात होणाऱ्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचाही कार्यक्रम व्यस्त आहे, असेही मनी यांनी सांगितले आहे.

‘ब’ संघाची चर्चा नाही
भारताचा मुख्य संघ कसोटी अजिंक्‍यपद अंतिम सामना खेळणार असल्यामुळे आशिया कपसाठी त्यांचा ब संघ पाठवला जाण्याची चर्चा आम्हीसुद्धा ऐकली, परंतु अधिकृतपणे कोणतीही चर्चा झालेली नाही असे मनी म्हणाले.

भारतातील वर्ल्डकपमध्ये खेळणार
दरम्यान, या वर्षात भारतात होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा संघ खेळणार असल्याचे आम्ही आयसीसीला आश्‍वासन दिले असल्याचे मनी यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या