पोवार पुन्हा महिला संघाचे मार्गदर्शक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 May 2021

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रमेश पोवार पुन्हा एकदा महिला क्रिकेट संघाचे मार्गदर्शक  झाले आहे. मदनलाल यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने डब्ल्यूव्ही रामन यांना वगळून पोवार यांच्या नावाची केलेली शिफारस बीसीसीआयने मान्य केली.

मुंबई - माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रमेश पोवार पुन्हा एकदा महिला क्रिकेट संघाचे मार्गदर्शक  झाले आहे. मदनलाल यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने डब्ल्यूव्ही रामन यांना वगळून पोवार यांच्या नावाची केलेली शिफारस बीसीसीआयने मान्य केली. आगामी इंग्लंड दौऱ्यापासून पोवार मार्गदर्शकपदाची सूत्रे स्वीकारतील. 

२०१८ मध्ये पोवार महिला संघाचे मार्गदर्शक होते; परंतु ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर अनुभवी खेळाडू मिताली राजबरोबर वाद झाल्यामुळे पोवार यांना पदावरून दूर करण्यात आले होते. नव्या नियुक्तीसाठी पोवार यांच्यासह डब्ल्यूव्ही रामन, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा यांच्यासह आठ जण स्पर्धेत होते, परंतु क्रिकेट सल्लागार समितीने पोवार यांना पसंती दिली आहे.

२०१८ तुषार आरोठे यांच्याकडून पोवार यांनी सूत्रे घेतली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत आव्हान संपुष्टात आल्यानंतर पोवार आणि मिताली राज यांच्यातील वाद पुढे आले होते. मितालीला अंतिम संघात स्थान न देण्यावर हे वाद झाले होते. खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने पोवार यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता.

एप्रिल महिन्यात झालेल्या विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत पोवार यांच्या मार्गदर्शकपदी मुंबईने विजेतेपद मिळवले होते. पोवार हे स्वतः दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर त्याने लेव्हल-२ चे कोचिंग प्रशिक्षण पूर्ण केले आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही त्यांनी कोचिंगचे प्रशिक्षण घेतलेले आहे. 

रामन यांचा कार्यकाल ऑक्टोबर महिन्यात संपला होता, परंतु दीड महिन्यापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी रामन यांना मार्गदर्शकपदी कायम ठेवण्यात आले होते. भारतीय महिला संघ २ जून रोजी इंग्लंडला प्रयाण करणार आहे, तेथे एकमेव कसोटी आणि त्यानंतर तीन ट्वेन्टी-२० व तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

मुलाखतीच्यावेळी पोवार यांना मिथाली राज हिच्याबरोबरील वादंगाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी माझ्याकडून काही प्रश्न नव्हते, असे सांगितले. आता आपल्याला नेमके काय चुकले हे नक्कीच बघावे लागेल.
- मदनलाल


​ ​

संबंधित बातम्या