युवीच्या भात्यातून पुन्हा एकदा षटकारांची बरसात

सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 17 March 2021

युवराजने वेस्ट इंडिज लिजंड्स विरुद्ध सुरु असलेल्या सेमीफायनलच्या सामन्यात षटकारांचा वर्षाव केला. याआधीच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या युवराजने या सामन्यात 20 चेंडूत 49 धावा कुटल्या.

नवी दिल्ली - रोड सेफ्टी वर्ल्ड सरीज 2021 मध्ये इंडिया लिजंडसचा फलंदाज युवराज सिंगने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली. युवराजने वेस्ट इंडिज लिजंड्स विरुद्ध सुरु असलेल्या सेमीफायनलच्या सामन्यात षटकारांचा वर्षाव केला. याआधीच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या युवराजने या सामन्यात 20 चेंडूत 49 धावा कुटल्या. युवराजने त्याच्या खेळीत एकूण सहा षटकार खेचले. यातील 5 षटकार तर फक्त 7 चेंडूत मारले होते. युवराजच्या या फलंदाजीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने 20 षटकात 3 बाद 218 धावा केल्या. 

इंडिया लिजंड्सकडून युवराज शिवाय कर्णधार सचिन तेंडुलकरने 42 चेंडूत 65 धावा केल्या. सचिनने 3 षटकार आणि 6 चौकार लगावले. तसंच स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विरेंद्र सेहवागने 17 चेंडूत  35 धावांची खेळी केली. तर मधल्या फळीत खेळणाऱ्या युसुफ पठाणने 20 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. 

युवराजने पुन्हा फटकेबाजी करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. युवराजनं शेवटच्या दोन षटकात उत्तुंग फटके मारत प्रेक्षकांचं मन जिंकलं. सिक्सर किंग युवराजने महेंद्र नागामुट्टीच्या पहिल्या तीन चेंडूवर षटकार खेचले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर धाव घेता आली नाही. मात्र त्यानंतर पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार लगावला. त्यानंतर अखेरचं षटक टाकणाऱ्या सुलेमान बेनच्या षटकातही युवराज सिंगने दोन षटकार मारले. 

क्रीडाविश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अठराव्या षटकात युवराज सिंगचा झेल सुटला होता. त्यावेळी त्यानं 9 चेंडूत फक्त 10 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर 19 व्या षटकात त्यानं सामन्याचं चित्रच बदललं. युवराजनं त्यानंतर 7 चेंडूत जवळपास 5 षटकार खेचले. संघाचा डाव संपेपर्यंत 20 चेंडूत त्याच्या खात्यात 49 धावा जमा झाल्या होत्या. युवराज सिंगने रोड सेफ्टी सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिका लिजंड्सविरुद्ध सलग चार षटकार मारले होते. 


​ ​

संबंधित बातम्या