RSWS T20 : लिजेंड्स गेममध्येही आफ्रिका ठरले चोकर्स; श्रीलंका-भारत यांच्यात रंगणार फायनल

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 March 2021

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चोकर्सची उपमाही देण्यात येते. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघावर पुन्हा एकदा चोकर्सची नामुष्की ओढावली आहे.

Road Safety World Series T20 :  रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी-20 स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये श्रीलंका लिजेंड्सने दक्षिण आफ्रिकेला आठ गडी राखून पराभूत केले. या सामन्यातील विजयासह श्रीलंका संघाने फायनल गाठली असून दिलशानच्या नेतृत्वाखालील संघ आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्सविरुद्ध जेतेपदासाठी भिडणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अनेक द्विपक्षिय सामन्यात सहजासहजी विजय मिळवतो. पण एखाद्या मोठ्या स्पर्धेत त्यांच्यावर नॉक आउटमध्ये पॅकअप करण्याची वेळ येते, हे चित्र अनेकदा पाहायला मिळाले आहे. यावरुनच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चोकर्सची उपमाही देण्यात येते. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघावर पुन्हा एकदा चोकर्सची नामुष्की ओढावली आहे.

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये श्रीलकेचा कर्णधार दिलशानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नुवान कुलशेकराच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजांनी नांगी टाकली. या एकट्याने अर्धा संघ तंबूत धाडला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर मॉर्नो व्हॅन विक याने 47 चेंडूत केलेल्या 53 धावा वगळता अन्य कोणालाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. अल्व्हिरो पीटरसन याने 27 आणि जस्टिन केम्पने केलेल्या 15  धावांशिवाय अन्य एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा डाव निर्धारित 20 षटकात 125 धावांत आटोपला. 

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकन दिग्गजांची सुरुवातही खराब झाली. धावफलकावर अवघ्या 20 धावा असताना तिलकरत्ने दिलशानच्या रुपात श्रीलंकेला पहिला धक्का बसला. मकाय अँन्टनी याने त्याची विकेट घेतली. दिलशानने 17 चेंडूत 18 धावा केल्या. सनथ जयसूर्या देखील 18 चेंडूत 18 धावा करुन परतला. पीटरसनने त्याला बाद केले. त्यानंतर उपुल थरंगा 39(44)* आणि जयसिंगेने अवघ्या 25 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने झटपट 47 धावांची नाबाद खेळी करत संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले. 

पहिल्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिज आणि इंडिया लिजेंड्स यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात इंडिया लिजेंड्सने 12 धावांनी विजय नोंदवत फायनल गाठली होती. आता स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंका विरुद्ध भारत अशी लढत पाहायला मिळणार आहे. रविवारी 21 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमधील मेगा फायनलची लढत रंगेल. या सामन्यात जयसूर्या, सचिन या दिग्गजांसह दिलशान आणि युवी यांच्या फटकेबाजी पाहायला मिळणार आहे.    
 


​ ​

संबंधित बातम्या