क्रिकेटमधील ‘दादा’ राजकीय मैदानात?

श्‍यामल रॉय
Thursday, 31 December 2020

सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी राजभवनात जाऊन राज्यपाल जगदीप धनकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर दिसले.

कोलकता - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली राजकारणात प्रवेश करण्यासंबंधी आणि पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याच्या अफवांचे जणू पीकच आले आहे. मात्र दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार व माजी आमदार अशोक भट्टाचार्य यांनी ‘दादा’ला राजकारणात न येण्याची विनंती केली.

मास्टर ब्लास्टरनेच सांगितले कोण भारी; अजिंक्य की विराट

सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी राजभवनात जाऊन राज्यपाल जगदीप धनकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर दिसले. ‘माकप’चे नेते व गांगुली यांचे नातलग असलेले अशोक भट्टाचार्य यांनी त्यांची भेट घेतली. गांगुली यांच्या घरातून बाहेर पडतानाचे छायाचित्रह त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सौरव यांनी राजकारणात प्रवेश करू नये, अशी विनंती केल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.

टीम इंडियाच्या महिला खेळाडूंना पाहावी लागणार वाट; ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलला!

मतदारसंघाच्या कामासाठी कोलकत्यात आल्यानंतर गांगुली यांच्या निमंत्रणावरून भट्टाचार्य हे बुधवारी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सौरव व त्यांची पत्नी डोया यांच्याबरोबर चहापानाच्यावेळी अन्य विषयांबरोबरच राजकारणावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. ‘‘मी पूर्णवेळ राजकारणात असलो तरी सौरव यांचे मूळ क्रिकेट क्षेत्र आहे क्रिकेटमुळेच सौरव गांगुली यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे आणि ते आजही युवावर्गाचे आदर्श आहेत, असे मी त्यांना सांगितले. राजकारणात माझ्याबरोबर येण्याचा सल्ला मी त्यांना देऊ शकलो असतो, पण मी तसे केले नाही,'' असा दावा भट्टाचार्य यांनी केला. भट्टाचार्य  यांच्या भेटीवरूनहून सौरव लवकरच राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची कुजबूज सुरू झाली.

क्रीडा मंत्री राजकारण सोडण्याचा अंदाज
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सरकारमधील क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला हे राजकारण सोडणार असल्याचे अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. शुक्ला हे माजी कसोटी क्रिकेटपटू आहेत. बंगाल क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ते काल इडन गार्डन्स येथे गेले होते. त्यावरून ते पुन्हा क्रिकेटच्या मैदानाकडे परतणार असल्याचे तर्क व्यक्त होत आहेत. पण त्यावर खुलासा करताना शुक्ला म्हणाले की, इडन गार्डन्स हे माझे दुसरे घरच आहे. मी तेथे केवळ सभेला उपस्थित होतो. पण मंत्रीपदावरील कोणीही व्यक्ती क्रिकेट संघटनेची पदाधिकारी असू शकत नाही, या लोटा आयोगाच्या नियमावर बोट ठेवून शुक्ला राजकारण सोडण्याच्या तयारीत असल्याकडे  काही जणांनी लक्ष वेधले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या