धावा, विकेट मोजल्या आता आर्थिक सहाय्य करा; गुणलेखकांची गांगुलींकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 June 2021

सचिन तेंडुलकरने केलेल्या हजारो धावा, विराट कोहलीची अनेक शतके आणि कपिलदेव, अनिल कुंबळे यांनी मिळवलेल्या अनेक विक्रमी विकेट यांची अचुक नोंद करणाऱ्या क्रिकेट गुणलेखकांचे (स्कोअरर) स्वतःचे बँक बॅलन्समात्र कोलमडले आहे.

मुंबई - सचिन तेंडुलकरने केलेल्या हजारो धावा, विराट कोहलीची अनेक शतके आणि कपिलदेव, अनिल कुंबळे यांनी मिळवलेल्या अनेक विक्रमी विकेट यांची अचुक नोंद करणाऱ्या क्रिकेट गुणलेखकांचे (स्कोअरर) स्वतःचे बँक बॅलन्समात्र कोलमडले आहे.

बीसीसीआयच्या दप्तरी अधिकृत नोंद असलेल्या, परंतु आता निवृत्त झालेल्या १७ गुणलेखकांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे निवृत्ती मानधनाची मागणी केली आहे. हे १७ गुणलेखक वयाच्या ५५ व्या वर्षांनंतर निवृत्त झाले आहेत.

मुंबई क्रिकेट संघटनेचे सिनियर गुणलेखक विवेक गुप्ता यांनी देशभरातील इतर सर्व गुणलेखकांसाठी पुढाकार घेत निवृत्त झालेल्या १७ गुणलेखकांसाठी गांगुली यांना ई-मेल करून परिस्थितीची माहिती करून दिली आणि निवृत्तीनंतरच्या मानधनाची मागणी केली आहे.

गुणलेखकांना मैदानावर कसरत करावी लागत नाही, त्यामुळे मुळात आमचे निवृत्तीचे वय वाढवा अशी मागणीही गुप्ता यांनी केली आहे. बीसीसीआयने नुकतेच पंचांच्या निवृत्तीचे वय ५५ वरून ६० असे केले आहे.

आम्ही सर्व १७ निवत्त गुणलेखक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे गुणलेखन जवळपास तीन दशकांपासून करत आहोत, असेही गुप्ता यांनी या ई-मेलमध्ये म्हटले आहे.

बीसीसीआयशी संलग्न असलेल्या गुणलेखकांना प्रत्येक सामन्यासाठी १० हजार रुपये मिळतात, परंतु कोरोनामुळे लाल चेंडूने खेळले जाणारे सामनेच न झाल्याने गुणलेखकांचे उत्पन्न काहीच झाले नाही. अशात जे गेल्या वर्षापासून निवृत्त झाले त्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे.

जेव्हा आम्ही गुणलेखनास सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक सामन्याला दरदिवशी ५० रुपये मिळायचे, काही सिनियर गुणलेखकांनी तर आपले आयुष्य या क्षेत्रासाठा वाहून घेतले, त्यांना उत्पन्नाचे दुसरे स्रोत नसल्यामुळे आता त्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे, असा उल्लेख गुप्ता यांनी गांगुली यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.


​ ​

संबंधित बातम्या