सचिनला कोरोना; लारा, सेहवाग युवीसह अन्य दिग्गजांवर क्वारंटाईनची वेळ?

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 27 March 2021

ब्रायन लारा, सनथ जयसूर्या, जॉन्टी ऱ्होड्स, दिलशान, पीटरसन आणि अन्य खेळाडू सचिनच्या संपर्कात आले होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. सचिन नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळून मुंबईला परतला असून कोरोना चाचणीनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आल्याची माहिती त्याने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. तो सध्या होम क्वारंटाईन झाला असून मास्टर ब्लास्टरने आपल्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहनही  केले आहे. सचिनच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्स संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे जेतेपद पटकावले होते.

सचिनच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्सच्या संघात विरेंद्र सेहवाग युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठान, मुनाफ पटेल हे  खेळाडू खेळताना पाहायला मिळाले होते. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघातील  ब्रायन लारा, सनथ जयसूर्या, जॉन्टी ऱ्होड्स, दिलशान, पीटरसन   या दिग्गजांचा समावेश होता. हे आणि अन्य खेळाडू सचिनच्या संपर्कात आले असून त्यांच्यावर क्वारंटाईनची वेळ येणार असल्याचे दिसते.  

कोरोनामुळे स्थगित झालेल्या स्पर्धेत सचिन खेळताना दिसले

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ही स्पर्धा मागिल वर्षी नियोजित होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्याच्या मैदानात या स्पर्धेतील सामने नियोजित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा ही स्पर्धा प्रेक्षाविना मुंबईच्या मैदानात खेळवण्याचा निर्णय झाला. तीन सामन्यानंतर स्पर्धा स्थगित करावी लागली. रायपूरच्या मैदानातून स्पर्धेला सुरुवात झाली. मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगलेल्या स्पर्धेतील अंतिम सामना 21 मार्च रोजी इंडिया लिजेंड्स आणि श्रीलंका लिजेंड्स यांच्यात झाला होता. सचिनच्या नेतृत्वाखालील संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. सचिन-विरु जोडीची फटकेबाजी प्रेक्षकांना या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळाली होती.     

 


​ ​

संबंधित बातम्या