Video: सचिनने एन्टीनीला लगावला स्ट्रेट ड्राईव्ह; चाहत्यांना आठवले जुने दिवस

सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 14 March 2021

निवृत्त झाल्यानंतरही क्रिकेटच्या मैदानात सचिनचा बोलबाला आहे. वयाच्या ४७व्या वर्षी त्याच्या स्ट्रेट ड्राईव्हची धार कायम आहे.

रायपूर: Road Safety World Series 2021 मध्ये शनिवारी इंडिया लिजंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लिजंड्स संघावर ५६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघाने दमदार फलंदाजी करत २० षटकात २०४ धावा कुटल्या. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सुरूवातीच्या षटकांमध्ये केलेली संयमी पण फकटेबाज खेळी आणि अखेरच्या षटकांमध्ये युवराज सिंगने केलेला षटकारांचा वर्षाव याच्या बळावर भारताने द्विशतकी मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला मात्र १४८ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात सचिनने लगावलेल्या 'स्ट्रेट ड्राईव्ह'ने चाहत्यांना पूर्वीच्या सचिनची आठवण करून दिली.

प्रथम फलंदाजी करताना सचिनने दमदार सुरूवात केली. त्याने ३७ चेंडूत ६० धावांची खेळी केली. त्यात ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टीनी याच्या गोलंदाजीवर सचिनने एक स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. त्या फटक्यामुळे चाहत्यांना जुन्या सचिनची आठवण झाली. निवृत्तीआधी एन्टीनी गोलंदाजी करत असताना फलंदाज त्याला घाबरायचे. पण सचिनने मात्र त्याच्या गोलंदाजीवर अनेकदा फटकेबाजी केली होती. त्याचाच प्रत्यय चाहत्यांना कालच्या सामन्यात आला. त्यामुळे अनेक चाहत्यांनी ट्विटरवर याबद्दल पोस्ट करून आपल्या भावना मांडल्या.

दरम्यान, वर्ल्ड रोड सेफटी सिरीज स्पर्धेत इंडिया लिजंट्स संघाकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ६० धावा केल्या. त्याने चांगली फटकेबाजी करत डावाचा पाया रचला. त्याच्यासोबत एस बद्रीनाथनेही फटकेबाजी केली. बद्रीनाथने ३४ चेंडूत ४ चौकार, २ षटकारांसह ४२ धावा केल्या. त्याच्यानंतर युसुफ पठाणने दहा चेंडूत २३ धावांची वेगवान खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये युवराजने २२ चेंडूत २ चौकार आणि सहा षटकारांसह ५२ धावांची खेळी केली.

हा Video पाहाच- टायगर जिंदा है..!! युवराजने एकाच ओव्हरमध्ये लगावले सलग चार सिक्सर

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पुटीक आणि वॅन विक यांनी दमदार सुरूवात केली. या दोघांनी ८७ धावांची सलामी दिली. पण पुटीक ४१ तर वॅन विक ४८ धावांवर बाद झाला. त्यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केली. केवळ जॉन्टी ऱ्होड्सने २२ धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांना आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे त्यांचा डाव १४८ धावांपर्यंतच पोहोचू शकला.


​ ​

संबंधित बातम्या