शार्दुल अष्टपैलुत्व सिद्ध करत आहे : भरत अरुण

पीटीआय
Thursday, 13 May 2021

हार्दिक पंड्या पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी करू शकत नसल्यामुळे शार्दुल ठाकूरने स्वतःला अष्टपैलू खेळाडूसाठी घडवण्यास सुरुवात केली आहे, असे मत भारतीय संघातील गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली - हार्दिक पंड्या पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी करू शकत नसल्यामुळे शार्दुल ठाकूरने स्वतःला अष्टपैलू खेळाडूसाठी घडवण्यास सुरुवात केली आहे, असे मत भारतीय संघातील गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण यांनी व्यक्त केले.

हार्दिक पंड्या गोलंदाजी करू शकत नसल्यामुळे त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. भारतीय संघाला वेगवान गोलंदाज आणि फलंदाज अशा अष्टपैलूची उणीव जाणवत आहे. शार्दुल हीच उणीव भरून काढण्यासाठी स्वतःला तयार करत आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुलची निवड करण्याबाबत अंतिम अधिकार हे निवड समितीचे असतील, पण शार्दुलने त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा अष्टपैलू गुणवत्ता दाखवली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने स्वतःला सिद्धही केले असे अरुण म्हणाले.

हार्दिक पंड्या २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये अखेरचा कसोटी सामना खेळलेला आहे. २०१९ पासून त्याला पाठीच्या दुखापतीने सतावलेले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील काही सामन्यांत त्याने गोलंदाजी केली होती, परंतु पुन्हा आयपीएलमध्ये तो गोलंदाजीपासून दूर राहिला.

वेगवान गोलंदाज अष्टपैलूचा शोध नेहमीच कायम राहिला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधून शोध घ्यावा लागेल, आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे आम्हाला देशांतर्गत सामने पाहण्याची जास्त संधी मिळत नाही, असे अरुण यांनी सांगितले. जैवसुरक्षा रचना यातून एवढ्यात काही सुटका होणार नाही हे उघड आहे, त्यामुळे संघातील सहा प्रमुख वेगवान गोलंदाजांवरील ताण आम्ही कमी करणार आहोत. आलटून पालटून संधी देणार आहोत, असेही अरुण म्हणाले.

भारताचा इंग्लंड दौरा आव्हानात्मक असणार आहे. चार महिने भारतीय संघ इंग्लंडमध्ये असणार आहे यात कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच असे एकूण सहा कसोटी सामने खेळणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या