''टी-ट्वेन्टी मध्ये बाबर आझम एक नंबर; विराट कोहली नाही.'' 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 27 December 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज दशकातील कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज दशकातील कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा केली. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी संघात भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली आणि आर अश्विन यांना स्थान मिळाले. यानंतर एकदिवसीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश करत, या संघाचे नेतृत्व आयसीसीने महेंद्रसिंग धोनीकडे दिले आहे. तर टी-ट्वेन्टी संघाचे कर्णधारपद देखील महेंद्र सिंग धोनीकडे सोपवत या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आयसीसीने केला आहे. मात्र आयसीसीने जाहीर केलेल्या या तिन्ही संघांमध्ये कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केलेला नाही. आणि त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसीवर चांगलाच चिडला आहे.       

AUSvsIND : रिषभ पंतचा झेल टिपताच टीम पेनच्या नावावर झाला विक्रम  

पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज असलेल्या शोएब अख्तरने आयसीसीने जाहीर केलेल्या दशकातील कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघावर चांगलीच आगपाखड केली आहे. शोएब अख्तरने आयसीसीने जाहीर केलेले संघ वर्ल्ड संघ नसून, इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील प्लेयिंग इलेव्हनची घोषणा केले असल्याची टीका केली आहे. याशिवाय पाकिस्तान देखील आयसीसीचा सदस्य आहे आणि पाकिस्तानचा संघ देखील टी-ट्वेन्टी क्रिकेट खेळत असल्याचे सांगत, कदाचित आयसीसीला याचा विसर पडला असल्याचे शोएब अख्तरने म्हटले आहे. 

तसेच, कसोटी आणि एकदिवसीय संघाबद्दल शोएब अख्तरने फार काही न बोलता, आयसीसीने जाहीर केलेल्या टी-ट्वेन्टी संघाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. खासकरून बाबर आझमला टी-ट्वेन्टी संघात समाविष्ट न केल्यामुळे शोएब अख्तर अस्वस्थ झाला आहे. आयसीसीने दशकातील टी-ट्वेन्टी संघाची घोषणा करताना बाबर आझमची निवड केली नाही. आणि तो सध्या या क्रिकेटच्या प्रकारातील उत्तम फलंदाज असल्याचे शोएब अख्तरने म्हटले आहे. याव्यतिरिक्त आयसीसीने पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूची निवड केलेली नाही. त्यामुळे आम्हाला दशकातील सर्वोत्कृष्ट टी-ट्वेन्टी संघाची गरज नसून, आयसीसीने आयपीएल संघ निवडलेला असल्याचे त्याने पुढे म्हटले आहे. इतकेच नाही तर शोएब अख्तरने, आयसीसी केवळ पैशासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप देखील त्याने केला आहे. 

AUSvsIND: किंग कोहली अजिंक्यवर फिदा; नाबाद शतकी खेळीची केली विराट स्तुती

त्यानंतर, पुढे शोएब अख्तरने विराट कोहलीपेक्षा पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझम हा टी-ट्वेन्टीच्या क्रिकेट प्रकारात सगळ्यात उत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये बाबर आजमपेक्षा मोठा खेळाडू नाही. पाकिस्तानकडून या प्रकारात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. आणि त्याची सरासरी बरेच काही सांगत असल्याचे  शोएब अख्तरने म्हटले आहे. त्यामुळे बाबर आझम विराट कोहलीपेक्षा पुढे असल्याचे शोएब अख्तरने सांगितले. व त्यामुळे आयसीसीने जाहीर केलेला संघ म्हणजे निराशाजनक असल्याची टीका त्याने केली आहे. 

दरम्यान, आयसीसीने जाहीर केलेला दशकातील टी-ट्वेन्टी संघ - 
रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), केरॉन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.    

    

 


​ ​

संबंधित बातम्या