पाकविरुद्ध व्हॅन डर डुसेननं झळकावलं वनडेतील पहिलं शतक

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 2 April 2021

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना हा सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट्स पार्कच्या मैदानात खेळवण्यात येत आहे.

South Africa vs Pakistan 1st ODI : पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मध्यफळीतील फलंदाजाने दिमाखदार खेळी केली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर व्हॅन डर डुसेन  नाबाद शतक झळकावले. त्याने 134 चेंडूत केलेल्या 123 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाहुण्या पाकिस्तानसमोर आव्हानात्मक टार्गेट दिले आहे.  पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

मर्करम आणि डिकॉक या जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. शाहीन आफ्रिदीने डिकॉकच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्याने 18 चेंडूत 20 धावा केल्या. आफ्रिदीनेच मर्करमचा खेळही 19 धावांवरच खल्लास केला.  क्लासे अवघ्या एका धावेची भर घालून परतल्यानंतर   व्हॅन डर डुसेन याने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने मिलरसोबत 116 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. 

नटराजनची सुंदर ड्राइव्ह; आनंद महिंद्रांना दिलं खास रिटर्न गिफ्ट

मिलरने 56 चेंडूत 5 चौकाराच्या साथीने 50 धावा केल्या. तळाच्या फलंदाजीतील फेहलुकावायो याने 35 चेंडूत 29 धावा करत डुसेनला साथ दिली. डुसेन शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. यापूर्वी त्याने 21 सामन्यात 7 अर्धशतके झळकावली होती. आता त्याच्या नावे नाबाद 123 धावांची सर्वोच्च खेळीची नोंद झाली आहे. 

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना हा सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट्स पार्कच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. दुसरा सामना जोहन्सबर्ग तर तिसरा सामना पुन्हा याच मैदानात होणार आहे. वनडे मालिकेनंतर पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चार टी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या