धोनीची साथ सोडणाऱ्या रैनाला धक्के बसायला सुरुवात

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 12 December 2020

कोरोनाजन्य परिस्थितीत भारताऐवजी युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात होता. आयपीएल स्पर्धेसाठी युएईला रवाना होण्यापूर्वीच त्याने धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

नवी दिल्ली : युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेणाऱ्या सुरेश रैनाला मोठा धक्का बसलाय. देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्व हे युवा प्रियम गर्गकडे सोपवण्यात आले आहे. आगामी आयपीएल हंगामातील लिलावात फिट आणि लक्षवेधी राहावे यासाठी रैना देशांतर्गत क्रिकेटमध्ये फोकस करत आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशच्या संघाचे नेतृत्व सुरेश रैनाकडे येईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र अखेर ही चर्चा आता फोल ठरली आहे. शनिवारी उत्तर प्रदेश क्रिकेट बोर्डाने आगामी स्पर्धेसाठी संघाच्या नेतृत्वाची धूराही प्रियम गर्गच्या खांद्यावर सोपवली आहे.  

कोरोनाजन्य परिस्थितीत भारताऐवजी युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात होता. आयपीएल स्पर्धेसाठी युएईला रवाना होण्यापूर्वीच त्याने धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयपीएलमध्ये खेळत राहण्याचे त्याने स्पष्टही केले. 15 ऑगस्ट रोजी धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बायबाय करणारा रैना युएईला गेला. मात्र स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच त्याने संघाची आणि धोनीची साथ सोडली होती. त्याने वैयक्तिक कारण देत माघार घेतली असली तरी याप्रकरणानंतर क्रिकेटवर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते.  

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेल्या युवा क्रिकेटरने उडवला लग्नाचा बार!

यासर्व प्रकरणानंतर रैनाने उत्तर प्रदेशकडून खेळत देशांतर्गत आणि व्यावसायिक क्रिकेट खेळत राहणार असल्याचेही स्पष्ट केले. यासाठी तो कठोर मेहनतही घेत आहे. त्याने सरावला सुरुवात केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या नेतृत्वाची धूरा त्याच्याकडे सोपवण्यात येईल, अशी चर्चा रंगली मात्र त्याच्या नावाचा कोणताही विचार उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने केलेला नाही. उत्तर प्रदेश क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी युवा चेहऱ्याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देत आहोत, अशी भूमिका युपी क्रिकेट बोर्डाने मांडली आहे. प्रियम गर्गला कर्णधार तर युवा करण शर्माकडे उप-कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

होणाऱ्या बायकोसाठी कायपण! क्रिकेटपटू उचलणार मोठं पाऊल

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाही करण्यात आलेले नाही. बीसीसीआय या स्पर्धेसंदर्भात लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची चर्चा सुरु आहे. ही स्पर्धा रैनाच्या दृष्टिनेही महत्त्वपूर्ण असणार आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या