Syed Mushtaq Ali Trophy : भुवी एक्स्प्रेस ऑन ट्रॅक; कोहली अन् सिलेक्टर्सचे वेधलं लक्ष

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

पंजाबने पहिला सामना 11 धावांनी जिंकला असला तरी उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या भुवीने सामन्यात लक्षवेधी कामगिरी नोंदवण्यात यश मिळवले.

Syed Mushtaq Ali Trophy : दुखापतीमुळे खूप दिवसांपासून टीम इंडियाच्या ताफ्यातून बाहेर असलेला भारतीय संघाची भुवी एक्स्प्रेस अखेर ट्रॅकवर आली आहे. भुवनेश्वर कुमारने  (Bhuvneshwar Kumar) रविवारपासून सुरु झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) या टी-20 स्पर्धेतून दमदार कमबॅक केले आहे. उत्तर प्रदेशच्या (Up vs Punjab) संघातून पंजाबविरुद्ध तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

पंजाब विरुद्ध गोलंदाजीला आल्यानंतर सुरुवातीला विकेटकीपर प्रभसिरमन सिंहने सलग दोन चौकार खेचून त्याचे स्वागत केले. मात्र अनुभवाच्या जोरावर भुवीनं यातून सावरत सामन्यात छाप सोडली. त्याने पंजाबच्या फलंदाजांना चांगला हिसका दाखवला. पंजाबने पहिला सामना 11 धावांनी जिंकला असला तरी उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या भुवीने सामन्यात लक्षवेधी कामगिरी नोंदवण्यात यश मिळवले. फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे उत्तर प्रदेशच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 134 धावा केल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या संघाला निर्धारित 20 षटकात 5 बाद 123 धावांपर्यंतच मजल मारता आली.  

 Syed Mushtaq Ali Trophy : कॅप्टन कृणाल पांड्यावर गंभीर आरोप; हुड्डाने संघ सोडला

भुवीने 8 व्या षटकात रमनदीपच्या स्वरुपात पहिला बळी मिळवला. त्यानंतरच्या षटकात त्याने अनमोलप्रीस सिंहला पहिल्याच चेंडूत तंबूत धाडले. याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने मंयक मार्केंडेला बाद करुन तीन विकेट घेतल्या. चार षटकांच्या कोट्यात त्याने 22 धावा खर्चून तीन विकेट मिळवल्या. आगामी इंग्लंड दौरा आणि आयपीएलच्या हंगामासाठी तयार असल्याचे संकेतच त्याने पहिल्या सामन्यात दिले.


​ ​

संबंधित बातम्या