तिसऱ्या कसोटीत भारताचे पारडे जड

सुनंदन लेले
Wednesday, 25 August 2021

इंग्लंडच्या दौऱ्यात कसोटी सामना सुरू होण्याअगोदर भारतीय संघाचे पारडे जड वाटण्याचे प्रसंग कमी आले आहेत. नॉटिंगहॅम कसोटीवर बऱ्यापैकी वर्चस्व गाजवल्यामुळे आणि लॉर्ड्‌स् कसोटी सामना दिमाखात जिंकल्याने भारताचे पारडे जड झाल्याचा भास होतोय.

लंडन - इंग्लंडच्या दौऱ्यात कसोटी सामना सुरू होण्याअगोदर भारतीय संघाचे पारडे जड वाटण्याचे प्रसंग कमी आले आहेत. नॉटिंगहॅम कसोटीवर बऱ्यापैकी वर्चस्व गाजवल्यामुळे आणि लॉर्ड्‌स् कसोटी सामना दिमाखात जिंकल्याने भारताचे पारडे जड झाल्याचा भास होतोय. त्यातून इंग्लंड संघाचे बलस्थान गोलंदाजीला धक्का बसला आहे आणि फलंदाजीत कमालीची अस्थिरता दिसते आहे. भारतीय संघ कोणतीही गोष्ट गृहीत न धरता नव्या सामन्याला नव्या उत्साहाने सामोरे जाण्याचा पक्का विचार करत आहे.

१९ वर्षांच्या कालखंडानंतर भारतीय संघ लीडसच्या हेडिंग्ले मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे. इंग्लंड देशाच्या नकाशात काहीसे उत्तरेकडे असलेल्या लीड्‌स गावात नेहमी थोडी जास्त थंड हवा वाहत असते. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळी हवामान चांगले राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. ‘कडक ऊन पडले तर हेडिंग्ले मैदानावर फलंदाजी करणे सोपे असते’, २००२ कसोटी सामन्यांतील विजयाची आठवण काढताना सचिन तेंडुलकर फोनवर बोलताना म्हणाला. ‘ढगाळ हवा असली आणि थंड वारे वाहत असले तर हेडिंग्लेची खेळपट्टी स्विंग गोलंदाजीला पोषक ठरते. सुरुवातीचा काळ तग धरला, उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या‍ चेंडूची छेड काढली नाही, तर नंतर फलंदाजी करायला मजा येते, कारण इथे फलंदाज सर्व फटके मारू शकतो.’

मलानला संधी मिळणार?
इंग्लंड संघात डेव्हिड मलानला परत घेण्यात आले आहे. मार्क वूडच्या जागी तरुण वेगवान गोलंदाज मेहमूदला पदार्पणाची संधी मिळेल असे संकेत मिळत आहेत. कोणाला घ्यायचे हा ज्यो रूटपुढे यक्षप्रश्न नसून जे खेळतात ते योग्य कामगिरी करतात का ही चिंता आहे. चारपैकी तीन डावांत ज्यो रूटने अफलातून फलंदाजी केली आहे. एकाच डावात रूटला लवकर बाद करण्यात यश मिळाल्यावर इंग्लंड संघ कसा अडचणीत सापडला आहे.

बदलाची शक्यता कमी
दुसरा कसोटी सामना जिंकलेला संघ विराट कोहली बदल करेल असे वाटत नाही. तिसऱ्या कसोटी सामन्याची तयारी करत असताना सामन्याअगोदर दोन दिवस महंमद शमी जास्त काळ सराव करताना दिसला नाही आणि शार्दुल ठाकूरने सांभाळून गोलंदाजी केली. म्हणून जर शमी तंदुरुस्त नसला तर उमेश यादवला संधी मिळू शकते. इंग्लंड संघात डावखुरे फलंदाज असल्याने जडेजाच्या जागी अश्विनला खेळवले गेले पाहिजे असे वाटत असले, तरी विराटचा विश्वास जडेजावर जास्त असल्याचे दिसून आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या