टीम इंडियाच्या महिला खेळाडूंना पाहावी लागणार वाट; ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलला!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढील सत्रापर्यंत तहकूब करण्यात आला आहे. त्यामुळे महिला क्रिकेट संघाला मैदानावर उतरण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढील सत्रापर्यंत तहकूब करण्यात आला आहे. त्यामुळे महिला क्रिकेट संघाला मैदानावर उतरण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय महिला संघाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्चमध्ये टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळला होता. भारतीय संघ 22 जानेवारीला कॅनबेरा, 25 जानेवारीला मेलबर्न आणि 28 जानेवारीला होबार्ट येथे एकदिवसीय सामना खेळणार होता. मात्र आता हा दौरा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

झम्पावर 2500 डॉलरचा दंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण 

भारतीय महिला संघाचा जानेवारीतील नियोजित दौरा मार्च-एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऑस्ट्रलियाच्या क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. तसेच आता ही मालिका 2022 मध्ये होणाऱ्या विश्वचषक सामन्यांच्या तयारीचा भाग राहणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय आगामी दौऱ्यात तीन टी-ट्वेन्टी सामने देखील खेळवण्यात येणार असल्याचे ऑस्ट्रलियाच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी, कोरोनाच्या कारणामुळे हा दौरा पुढील पुढील सत्रात आयोजित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय पुढील सत्रातील तारखा आणि ठिकाण लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने घेतलेल्या या निर्णयावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुरुषांचे सामने सध्या खेळवण्यात येत आहेत. मात्र महिला संघाचा दौरा स्थगित करण्यात आल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलिया काय स्पष्टीकरण देणार असे आकाश चोप्राने सोशल मीडियाच्या ट्विटरवर म्हटले आहे. तसेच हीच स्त्री-पुरुष समानता का, असा प्रतिप्रश्न देखील आकाश चोप्राने आपल्या या ट्विट मध्ये केला आहे. 

यंदाच्या वर्षी मार्च मध्ये पार पडलेल्या टी-ट्वेन्टी स्पर्धेच्या फायनल मध्ये भारतीय महिला संघाने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षातील महिला संघाचे सगळेच सामने रद्द करण्यात आले. तर कोरोनाची खबरदारी घेत पुरुषांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास पुन्हा सुरवात झाल्यानंतर महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जानेवारीत नियोजित करण्यात आला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पुन्हा एकदा कोरोनाची वाढती प्रकरणे समोर आल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे.           


​ ​

संबंधित बातम्या