पृथ्वी शॉला ई-पासशिवाय प्रवास करणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 May 2021

मुंबईहून गोव्याला मित्रासोबत जाणाऱ्या भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला ई-पासशिवाय प्रवास करणे महागात पडले. कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जाताना त्याला आंबोली चेक पोस्ट येथे पोलिसांनी रोखले.

सावंतवाडी - मुंबईहून गोव्याला मित्रासोबत जाणाऱ्या भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला ई-पासशिवाय प्रवास करणे महागात पडले. कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जाताना त्याला आंबोली चेक पोस्ट येथे पोलिसांनी रोखले. आधी ई-पास दाखव व नंतरच पुढे जा, अशी सूचना त्याला पोलिसांनी केली; मग उपरती झालेल्या पृथ्वीने ई-पास काढला. त्यानंतरच त्याला पुढील प्रवासाची परवानगी देण्यात आली. 

पृथ्वी शॉ आयपीएल रद्द झाल्याने कोल्हापूरमार्गे गोव्याकडे निघाला होता. सध्या कडक लॉकडाउन असल्याने जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास गरजेचा आहे; मात्र शासनाचे नियमच न पाळता पृथ्वी प्रवास करत होता. विशेष म्हणजे आंबोलीपर्यंत त्याला कुठेही अडवून पासबाबत चौकशी करण्यात आली नाही.

त्याची मोटार बुधवारी (ता.१२) सकाळी साडेअकराच्या सुमारास आंबोली पोलिस दूरक्षेत्राजवळ आली. तेथे आरोग्य विभागाने दोघांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी ई-पासबाबत विचारले, तेव्हा तो थोडा गडबडला. त्याने पास नसल्याचे सांगितले; मात्र पासशिवाय जाता येणार नाही, असे सांगत पोलिसांनी त्याला तेथेच रोखले. त्याने पोलिसांना विनंतीही केली; पण पोलिस कर्तव्यापासून जराही विचलित झाले नाहीत. ‘आधी ई-पास काढ आणि पुढचा प्रवास कर,’ अशा शब्दांत पोलिसांनी त्याला सुनावले. पृथ्वीने तेथूनच ऑनलाईन ई-पाससाठी अर्ज केला. त्यानंतर एक तासाने त्याचा पास तयार होऊन त्याच्या मोबाईलवर आला. तो पास पोलिसांना दाखवून पुढे गोव्याकडे मार्गस्थ झाला.


​ ​

संबंधित बातम्या