विराट कोहली 'तीन हजारी' मनसबदार;  'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 15 March 2021

भारतीय कर्णधार विराट कोहलीनं टी-२० मधील मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. 

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशनच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं इंग्लंडचा सात गड्यांनी  पराभव केला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं नाबाद ७३ धावांची खेळी करत टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. गेल्या काही सामन्यापासून विराट कोहलीला सूर गवसत नव्हता, मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यात कोहलीनं अर्धशतकी खेळी करत सर्वांची तोंडं बंद केली आहे. दुसऱ्या सामन्यात ७३ धावांची खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीनं टी-२० मधील मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. 

विराट कोहलीने ४९ चेंडूत ५ चौकार व तीन षटकारांच्या मदतीनं ७३ धावांची खेळी केली. यासह विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज बनला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला हे मानाचे स्थान मिळवता आलेले नाही. विराट कोहलीच्या नावावर आता ३००१ धावा आहेत. 

आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर २६ अर्धशतकांची नोंद आहे. यादरम्यान, त्याने ८४ षटकारही लगावले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराटनंतर सर्वाधिक धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल दुसऱ्या स्थानावर आहे. गप्टिलच्या अगदी पाठोपाठ भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आहे. मार्टिन गप्टिलने २८३९ धावा केल्या आहेत तर रोहित शर्माने २७७३ धावा केल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या