ICC Decade Awards: टी-20- टेस्ट सोडलं तर सर्व पुरस्कारावर 'विराट'ची मोहर 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काल दशकातील कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा केली होती. आणि त्यानंतर आता आयसीसीने दशकातील आयसीसीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काल दशकातील कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा केली होती. आणि त्यानंतर आता आयसीसीने दशकातील आयसीसीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आयसीसीकडून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.  

दशकातील कसोटी क्रिकेटपटू - 
आयसीसीने दशकातील कसोटी क्रिकेटपटू म्हणून ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथची निवड केली आहे. स्मिथने 7040 धावा यादरम्यान केलेल्या आहेत. यावेळेस स्मिथची सरासरी टॉप 50 फलंदाजांमध्ये सर्वाधिक 65.79 राहिला आहे. व 26 शतके, 28 अर्धशतके स्टीव्ह स्मिथने झळकावलेली आहेत. त्यामुळे दशकातील कसोटी क्रिकटपटू म्हणून आयसीसीने स्टीव्ह स्मिथची निवड करताना अनन्य, कठोर आणि अविश्वसनीय सातत्य असल्याचे म्हटले आहे. 

दशकातील टी-ट्वेन्टी क्रिकेटपटू -   
एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटपटुंच्या नंतर आयसीसीने टी-ट्वेन्टी क्रिकेट मधील दशकातील खेळाडू म्हणून अफगाणिस्तानच्या राशिद खानची निवड केली आहे. त्याने यादरम्यान सर्वाधिक 89 विकेट्स घेतल्या आहेत. व 12.62 ची सरासरी राशिद खानची राहिली आहे.  

 
दशकातील एकदिवसीय क्रिकेटपटू - 
त्याशिवाय, आयसीसीने दशकातील एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून देखील विराट कोहलीची निवड केली आहे. याकाळात विराट कोहली हा 10,000 हून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. तसेच यादरम्यान, 39 शतके आणि 48 अर्धशतके विराट कोहलीने झळकावलेली आहेत. तर यावेळेस 61.83 च्या सरासरीने विराटने धावांची बरसात केलेली आहे. याव्यतिरिक्त 112 झेल देखील विराट कोहलीने टिपले आहेत. 

 

सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार - 
आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून देण्यात येणाऱ्या सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कारावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने बाजी मारली आहे. विराट कोहलीने या काळात सर्वाधिक  20,396 धावा केलेल्या आहेत. तसेच यावेळेस त्याने सगळ्यात जास्त 66 शतके ठोकली असून, सर्वात जास्त 94 अर्धशतके देखील विराटच्याच नावावर झालेली आहेत. याशिवाय 70 हून अधिक डावांमध्ये विराटची सरासरी 56.97 होती. 

दरम्यान, काल दशकातील कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा आयसीसीने केली होती. त्यावेळेस आयसीसीने भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली आणि आर अश्विन यांना कसोटी संघात स्थान दिले होते. व कसोटी संघाचे नेतृत्व देखील आयसीसीने विराट कोहलीकडे सुपूर्द केले होते. यानंतर एकदिवसीय संघात देखील रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आयसीसीने करत, या संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे दिले होते. तर टी-ट्वेन्टी संघाचे कर्णधारपद देखील महेंद्र सिंग धोनीकडे सोपवत या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आयसीसीने केला होता.  

  
 


​ ​

संबंधित बातम्या