भारतातील विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धा अमिरातीत?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 May 2021

आयपीएलच्या यशस्वी संयोजनाद्वारे विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धेची दावेदारी भक्कम करण्याच्या भारतीय क्रिकेट मंडळाच्या योजनेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे आता विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धा भारताच्या सूचनेनुसार अमिरातीत घेण्याचा निर्णय आयसीसी जून महिन्यात घेण्याची चिन्हे आहेत.

मुंबई - आयपीएलच्या यशस्वी संयोजनाद्वारे विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धेची दावेदारी भक्कम करण्याच्या भारतीय क्रिकेट मंडळाच्या योजनेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे आता विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धा भारताच्या सूचनेनुसार अमिरातीत घेण्याचा निर्णय आयसीसी जून महिन्यात घेण्याची चिन्हे आहेत. 

भारतातील कोरोना रुग्ण वाढत असताना काही देश संघ पाठवण्यास तयार होणार नाहीत, या परिस्थितीत भारताची कोंडी होईल. त्यामुळे स्पर्धा भारताऐवजी अमिरातीत घेण्याचा प्रस्ताव भारताकडूनच आल्यास खूप काही साध्य होईल, असा विचार होत आहे. अमिरातीत शारजा, दुबई आणि अबू धाबी येथे सामने होऊ शकतील. स्पर्धा अमिरातीत झाली, तरी भारतीय मंडळच यजमान असेल, असे गणित मांडले जात आहे.

आयपीएलप्रमाणे विश्वकरंडक ट्वेंटी २० घेता येणार नाही. आयपीएलमध्ये एकावेळी दोनच ठिकाणी लढती घेण्यात आल्या होत्या; पण विश्वकरंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत आठ संघ आहेत, तर त्यानंतर अव्वल १२ संघात स्पर्धा होईल. यात विमान प्रवासही आवश्यक आहे. दोन शहरातच सामने घेतल्यास एका शहरात सहा संघांचा मुक्काम राहील. हे आव्हान सोपे नसेल, असे मानले जात आहे. 

गेल्या आठवड्यात भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयपीएल अमिरातीत होऊ शकते, असे सांगितले होते. त्या वेळी आयसीसीने स्पर्धेस पाच महिने शिल्लक आहेत, असे सांगितले होते. मात्र आता अमिरातीत स्पर्धा हाच पर्याय राहिला आहे. 

आयपीएलसाठी भारतीय मंडळाने तयार केलेल्या जैवसुरक्षा वातावरणाची पाहणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पथक एप्रिलच्या अखेरीस भारतात येणार होते; पण वाढत्या कोरोना रुग्णांमुळे त्यांनी दौरा रद्द केला. आता सध्याच्या परिस्थितीत आयपीएलचे संयोजन भारतीय मंडळाने अमिरातीत करणेच योग्य होईल, असेच सांगितले जात आहे. 

भारतीय मंडळास परदेशात आयपीएल घेण्याचा अनुभव आहे. भारताने २००९ मध्ये आफ्रिकेत आणि २०२० मध्ये अमिरातीत आयपीएल घेतली होती. त्याचबरोबर २०१४ च्या आयपीएलमधील सुरुवातीच्या लढती अमिरातीत झाल्या होत्या. 

भारतात नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत अमिरातीत स्पर्धा घेणे हाच योग्य पर्याय आहे. स्पर्धा अमिरातीत झाली, तरी भारत स्पर्धेचा यजमान असेल. 
- भारतीय क्रिकेट मंडळातील पदाधिकारी


​ ​

संबंधित बातम्या