पाटणा पायरेट्‌सचा मार्ग कठिण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 September 2019

-प्रो-कबड्डीच्या मोसमात दबंग दिल्ली संघाने आपले वर्चस्व कायम राखताना माजी विजेत्या पाटणा पायरेट्‌स संघाचा 43-39 असा पराभव केला.

-या विजयाने दिल्लीचे अव्वल स्थान भक्कम झाले, तर माजी विजेत्या पाटणा संघाचा मार्ग अधिकच कठिण झाला. ते नवव्या स्थानावर आले आहेत. 

-यंदाच्या मोसमात प्ले-ऑफसाठी दिल्ली, बंगाल आणि हरियाना हे तीन संघ निश्‍चित आहेत. मात्र, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या संघांसाठी चुरस आहे.

जयपूर - प्रो-कबड्डीच्या मोसमात दबंग दिल्ली संघाने आपले वर्चस्व कायम राखताना माजी विजेत्या पाटणा पायरेट्‌स संघाचा 43-39 असा पराभव केला. या विजयाने दिल्लीचे अव्वल स्थान भक्कम झाले, तर माजी विजेत्या पाटणा संघाचा मार्ग अधिकच कठिण झाला. ते नवव्या स्थानावर आले आहेत. 
अव्वल चढाईपटू प्रदीप नरवाल सातत्याने एका हाती पाटणा संघाचे आव्हान राखण्याचा प्रयत्न करतोय, पण सहकाऱ्यांकडून मिळत नसलेल्या साथीमुळे त्याचे प्रयत्न एकाकीच पडत आहेत. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हेच चित्र दिसून आले. संघाच्या 39 गुणांपैकी 19 गुण प्रदीपने मिळविल्यानंतरही पाटणा संघाला पुन्हा एकदा हार पत्करावी लागली. जान कुन लीने 7 गुण मिळवून त्याला साथ केली. त्यानंतरही दिल्लीच्या आक्रमकांना रोखण्यात त्यांच्या बचावपटूंना अपयश आले हे त्यांना मान्य करावेच लागेल. 
आजच्या सामन्यात दिल्लीच्या नविनकुमारने परत "सुपर टेन' कामगिरी केली. यात त्याला विजयच्या "सुपर टेन'ची जोड मिळाली. चंद्रन रणजितनेही आठ गुण कमावले. बचावात अनिल कुमारने 4 गुण करत आपली साथ केली. चढाई आणि बचावात वर्चस्व राखल्यानंतरही पाटणा संघाने दिल्लीवर दोन लोण चढवले याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. तुलनेत दिल्लीला केवळ एकच लोण परतवता आला. 
----------- 
तीन क्रमांकासाठी चुरस 
यंदाच्या मोसमात प्ले-ऑफसाठी दिल्ली, बंगाल आणि हरियाना हे तीन संघ निश्‍चित आहेत. मात्र, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या संघांसाठी चुरस आहे. मुंबई, बंगळूर, यु.पी. या तीन संघांचे प्रत्येकी 53 गुण झाले आहेत. आता मुंबईचे 5, बंगळूरचे चार, यु.पी.चे पाच सामने बाकी आहेत. या तिघांना गाठण्यासाठी जयपूर प्रयत्नांची शिकस्त करत आहे. त्यांचे 52 गुण असले, तरी त्यांचे तीन च सामने शिल्लक आहेत.


​ ​

संबंधित बातम्या