डेव्हिस करंडक लढतीसाठी भाजप नेते राजपाल टेनिस संघाचे कर्णधार

वृत्तसंस्था
Monday, 4 November 2019

- डेव्हिस करंडक लढतीसाठी लिअँडर पेस यांच्या नावाची जोरदार चर्चा होती; पण आता ही सूत्रे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील नेते रोहित राजपाल यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाल्याचे समजते. 

- राजपाल एकमेव डेव्हिस लढत कोरियाविरुद्ध खेळले आहेत. 

नवी दिल्ली - लिअँडर पेस बदली कर्णधार म्हणूनही अखिल भारतीय टेनिस संघटनेस नकोसे झाले आहेत. पाकिस्तानात होऊ घातलेल्या डेव्हिस करंडक लढतीसाठी लिअँडर पेस यांच्या नावाची जोरदार चर्चा होती; पण आता ही सूत्रे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील नेते रोहित राजपाल यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाल्याचे समजते. 
पाकिस्तानात जाण्यास भारतीय संघातील अव्वल टेनिसपटू; तसेच न खेळणारे कर्णधार महेश भूपती यांनी नकार दिला. ही लढत इस्लामाबादला 29 आणि 30 नोव्हेंबरला अपेक्षित आहे. ही लढत अन्यत्र हलवण्याची विनंती भारतीय टेनिस संघटनेने केली आहे; पण त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानला लढत झाल्यास दुय्यम संघ जाईल आणि राजपाल त्याचे न खेळणारे कर्णधार असतील, अशीच चिन्हे आहेत. 
भारतीय संघटनेचे अध्यक्ष प्रवीण महाजन; तसेच माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी राजपाल यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यास संघटनेच्या चंडीगड येथील सभेत मंजुरी देण्यात आली. हा बदल केवळ या लढतीसाठीच असेल, असे भारतीय टेनिस संघटनेच्या सूत्रांनी सांगितले. मूळ कार्यक्रमानुसार भारत-पाकिस्तान लढत सप्टेंबरमध्ये होणार होती; पण त्याचवेळी दोन देशांतील संबंध खूपच बिघडलेले होते. त्यामुळे लढत पुढे ढकलणे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघास भाग पडले होते. 

हे आहेत रोहित राजपाल 
- राजपाल एकमेव डेव्हिस लढत कोरियाविरुद्ध खेळले आहेत. 
- 1990 च्या त्या लढतीत भारताचा 0-5 पराभव. राजपाल कोर्टवर उतरण्यापूर्वीच भारत 0-3 पीछाडीवर होता. 
- राजपाल गतवर्षी निवड समितीचे अध्यक्ष 
- राजपाल दिल्ली लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष; तसेच भाजपचे नेते 

आनंद अमृतराज उत्सुक होते पण... 
पाकिस्तानातील लढतीसाठी न खेळणारे कर्णधार होण्यास आनंद अमृतराज कमालीचे उत्सुक होते. अमृतराज यांच्याऐवजीच भूपतींकडे हे पद सोपवण्यात आले होते. काही पदाधिकारीही त्यास तयार होते, पण अमृतराज यांनी किमान दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्याचा आग्रह धरल्याने त्यांचे नाव मागे पडले. 
 


​ ​

संबंधित बातम्या