मालन, मॉर्गन न्यूझीलंडवर बरसले

वृत्तसंस्था
Friday, 8 November 2019

- डेव्हिड मालनचे झंझावती शतक आणि त्याने कर्णधार इयॉन मॉर्गनसह केलेली विक्रमी भागीदारी याच्या जोरावर चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर बाजी मारली

- फलंदाजीने इंग्लंडने टी 20 क्रिकेटमधील आपली सर्वोच्च मजल मारताना 3 बाद 241 धावा केल्या.

नेपियर - डेव्हिड मालनचे झंझावती शतक आणि त्याने कर्णधार इयॉन मॉर्गनसह केलेली विक्रमी भागीदारी याच्या जोरावर चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर बाजी मारली. इंग्लंडने हा सामना 76 धावांनी जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. 
मालन (नाबाद 103) आणि मॉर्गन (91) यांच्या फलंदाजीने इंग्लंडने टी 20 क्रिकेटमधील आपली सर्वोच्च मजल मारताना 3 बाद 241 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 19 चेंडू शिल्लक असताना 165 धावांत आटोपला. मालिकेत 2-2 अशी बरोबरी असल्यामुळे आता रविवारी (ता.10) होणाऱ्या अखेरच्या पाचव्या सामन्यातील चुरस वाढली आहे. 
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने वेगवान सुरवात केली. पाच षटकांतच त्यांनी अर्धशतक गाठले; पण त्याच षटकात मार्टिन गुप्टिल (27) बाद झाला आणि त्यानंतर न्यूझीलंडचा डाव कधीच स्थिरावला नाही. केवळ टीम साऊदी (39) आणि कॉलिन मुन्‍रो (30) यांनाच काय तो प्रतिकार करता आला. इंग्लंडकडून मॅट पॅर्किन्सन याने 47 धावांत चार गडी बाद केले. ख्रिस जॉर्डनने 2 गडी बाद करून त्याला सुरेख साथ केली. 
त्यापूर्वी, इंग्लंडचा डाव म्हणजे केवळ चौकार, षटकारांची बरसात होती. मालनने 48 चेंडूंत शतक झळकाविताना इंग्लंडच्या ऍलेक्‍स हेल्सचा विक्रम मोडला. त्याने 60 चेंडूंत शतक झळकाविले होते. टी 20 क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून शतक झळकाविणारा मालन दुसराच क्रिकेटपटू ठरला. त्याने ईश सोधीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्याने 61 धावांवरून 89 धावांवर पोचताना सोधीच्या एका षटकांत तीन षटकार, दोन चौकार आणि दोन धावा घेतल्या. त्यानंतर बोल्टला षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. 
सॅंटनेरने पहिल्या दोन षटकांत 5 धावा देत इंग्लंडचे बेअरस्टॉ आणि टॉम बॅन्टन हे दोन मोहरे टिपले होते; पण त्यानंतर जे काही घडले ते फक्त स्वप्न होते. मालन आणि मॉर्गन यांनी तुफानी टोलेबाजी करून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. मालनने शतक ठोकले, पण मॉर्गन मात्र शतकापासून वंचित राहिला. 
संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड 20 षटकांत 3 बाद 241 (डेव्हिड मालन नाबाद 103 -51 चेंडू, 9 चौकार, 6 षटकार, मॉर्गन 91 -41 चेंडू, 7 चौकार, 7 षटकार, मिशेल सॅंटनेर 2-32) वि.वि. टीम साऊदी 39 - 15 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, कॉलिन मुन्‍रो 30, मॅट पार्किन्सन 4-47, ख्रिस जॉर्डन 2-24). 
-------------- 
इंग्लंडचे विक्रम 
-डेव्हिड मालनचे 48 चेंडूंत वेगवान शतक 
-मालन-मॉर्गन यांची तिसऱ्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी 
-मॉर्गनचे 21 चेंडूंत वेगवान अर्धशतक 
-इंग्लंडची टी 20 सामन्यातील 241 सर्वोच्च धावसंख्या 
-मालन-मॉर्गन जोडीकडून 13 षटकार, 16 चौकारांची बरसात 
-इंग्लंडच्या अखेरच्या चार षटकांत 76 धावा 


​ ​

संबंधित बातम्या