#ThisDayThatYear कपिल जिए 175 साल! साल के महिने भी हो 175!! 

मुकुंद पोतदार
Tuesday, 18 June 2019

गायक एखादा राग हजारो मैफलींमध्ये शेकडो वेळा गातो. साहित्यिक अनेक कादंबऱ्या लिहितो. पण कोणती "कलाकृती' केव्हा साकार होईल आणि "माईलस्टोन' ठरेल, हे काळाच्या ओघातच स्पष्ट होते. 

कला आणि क्रीडा अशा दोन क्षेत्रांत सक्रिय असलेल्या आणि त्यासाठी आयुष्य वेचलेल्या शिलेदारांच्या कारकिर्दीत एक परमोच्च बिंदू येत असतो. तो नेमका केव्हा येईल, याची कुणालाच कल्पना नसते. या मान्यवरांकडे, मातब्बरांकडे 'पथदर्शक' म्हणून पाहिले जाते, पण प्रत्यक्षात हे दिग्गज स्वतः सतत "विद्यार्थी' म्हणून वावरतात आणि दिवसागणिक "प्रगती'चा आलेख उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणूनच त्यांची कला जणू काही चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाते.

गायक एखादा राग हजारो मैफलींमध्ये शेकडो वेळा गातो. साहित्यिक अनेक कादंबऱ्या लिहितो. पण कोणती "कलाकृती' केव्हा साकार होईल आणि "माईलस्टोन' ठरेल, हे काळाच्या ओघातच स्पष्ट होते. 

असो, हा झाला कला क्षेत्राचा ऊहापोह. याच क्षेत्राच्या जोडीला असलेल्या क्रीडा क्षेत्रातही असेच चित्र दिसून येते. आंद्रे अगासीची विंबल्डनमधील कामगिरी, रॅफेल नदालचे फ्रेंच स्पर्धेतील वर्चस्व, गोल्फपटू टायगर वूड्‌सचा पराक्रम अशा "अचिव्हमेंट' क्रीडाप्रेमींच्या सदैव स्मरणात राहतात.

या वैयक्तिक खेळांच्या तुलनेत क्रिकेटसारख्या सांघिक खेळात तर अनेक "हिरे' चमकत असतात. 1983 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत झिंबाब्वेविरुद्ध कपिलदेवने साकारलेली 175 धावांची नाबाद खेळी हीसुद्धा एक "अजरामर कलाकृती'च ठरली. 

धावा 175 आणि ते सुद्धा नाबाद, चेंडू 138, चौकार 16, षटकार 6, स्ट्राईक रेट 126.81 असे आकडे पुरेसे आहेत. याशिवाय त्याने ज्या परिस्थितीत ही खेळी केली ते विचारात घेतल्यास कपिलचे श्रेष्ठत्व स्पष्ट होते. सुनील गावसकर, के. श्रीकांत हे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाले होते. मग 4 बाद 9, 5 बाद 17 अशी घसरगुंडी उडाली होती.

कर्णधार कपिलला गोलंदाजीत साथ देणारे सहकारीच उरले होते. कपिलपासून या "डेव्हिल'ना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी किल्ला लढविला. अकराव्या क्रमांकाच्या सईद किरमाणीच्या नाबाद 24, रॉजर बिन्नीच्या 22 व मदनलालच्या 17 धावासुद्धा तितक्‍याच बहुमोल ठरल्या.

 क्रिकेटचा इतिहास पाहिल्यास 1980 च्या दशकापर्यंत प्रामुख्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज याच देशांचे खेळाडू "रेकॉर्ड' करण्यात आघाडीवर असायचे, असे ढोबळमानाने म्हणता येईल. मात्र कपिलच्या त्या खेळीने भारताकडेच नव्हे तर "इतर' संघांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. संभाव्य विजेत्यांच्या यादीत (वरून) पहिला असलेल्या विंडीजला सलामीच्याच सामन्यात हरविल्यानंतर भारताने "अंडरडॉग'च्या यादीत (खालून) शेवटी असलेल्या झिंबाब्वेविरुद्ध हरणे फार महागात पडले असते. क्रिकेटमध्ये "जर-तर'ला स्थान नसते, असे म्हटले जाते, तरीही क्रिकेटच्या इतिहासाचे सिंहावलोकन करताना तेव्हा अमुक खेळला नसता तर तमुक झाले असते, अशी चर्चा होत असते. साहजिकच या "इनिंग'च्या रूपाने "अजरामर कलाकृती' साकार केलेल्या कपिलविषयी शीर्षकातील भावना "सही' ठरेल! 


​ ​

संबंधित बातम्या