दीपक जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर

वृत्तसंस्था
Friday, 27 September 2019

-जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक विजेता भारताचा दीपक पूनिया आता 86 किलो वजन गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आला आहे.

- बजरंग पूनियाला मात्र 65 किलो वजन गटातील अव्वल स्थान गमवावे लागले. तो आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. 

-जागतिक स्पर्धेतील कामगिरीनंतर महिला विभागात विनेश फोगट53 किलो वजन गटात दुसऱ्या स्थानापर्यंत पोचली आहे. तिने तब्बल चार गुणांची झेप घेतली.

नवी दिल्ली - जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक विजेता भारताचा दीपक पूनिया आता 86 किलो वजन गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आला आहे. त्याचवेळी बजरंग पूनियाला मात्र 65 किलो वजन गटातील अव्वल स्थान गमवावे लागले. तो आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. 
जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेनंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग महासंघाने कुस्तीगीरांची नवी क्रमवारी जाहीर केली. वरिष्ठ गटात प्रथमच खेळणाऱ्या दीपकने आपल्या परिपूर्ण कामगिरीने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात त्याला पायाला आणि डोळ्याला दुखापत झाली. त्यामुळे तंदुरुस्ती अभावी त्याला अंतिम लढतीतून माघार घ्यावी लागली होती. त्याने जागतिक विजेत्या याझदानी याला चार गुणांनी मागे टाकत 82 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. दीपकने या वर्षी यासर दोघू येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य, तर आशियाई अजिंक्‍यपद आणि सासारी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले होते. 
जागतिक स्पर्धेत अव्वल मानांकनासह बजरंग दाखल झाला होता. मात्र, स्पर्धेत त्याला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्याचे अव्वल मानांकन घसरले आणि तो नव्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आला. त्याचे 63 गुण असून, रशियाच्या गॅड्‌झीमुराद राशिडोव याने जगज्जेतेपदासह त्याला मागे टाकले. 
जागतिक क्रमवारीत अन्य भारतीयांमध्ये 57 किलो वजन गटात रवीकुमार दहिया पहिल्याच पाचांत आला आहे. तो 39 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. राहुल आवारेचे 61 किलो वजन गटातील दुसरे स्थान कायम राहिले आहे. 
-------------- 
विनेश दुसऱ्या, तर सीमा तिसऱ्या स्थानी 
जागतिक स्पर्धेतील कामगिरीनंतर महिला विभागात विनेश फोगट53 किलो वजन गटात दुसऱ्या स्थानापर्यंत पोचली आहे. तिने तब्बल चार गुणांची झेप घेतली. स्पर्धेत दुसऱ्या स्थानासह सहभागी झालेली सीमा बिस्ला 50 किलो वजन गटात तिसऱ्या स्थानावर आली आहे. पूजा धांडा हिलाही यंदा जागतिक स्पर्धेत चमक दाखवता आली नाही. ती 59 किलो वजन गटात पाचव्या स्थानावर आली आहे.


​ ​

संबंधित बातम्या