डेन्मार्क बॅडमिंटन - साईना श्रीकांतचा सलामीलाच पराभव

वृत्तसंस्था
Thursday, 17 October 2019

- जपानच्या सायाका ताकाहाशी हिने साईनाचे आव्हान सरळ दोन गेममध्ये 21-15, 23-21 असे संपुष्टात आणले. 

- पुरुष एकेरीत समीर वर्माने बाद फेरीत प्रवेश करताना जपानच्या कांता त्सुनेयामा याचा 21-111, 21-11 असा पराभव केला.

-  किदांबी श्रीकांत याचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. डेन्मार्कच्या आंद्रेस ऍन्टोन्सेन याने त्याचा 21-14, 21-18 असा पराभव केला. 

ओडेन्स (डेन्मार्क) - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिला डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही लय गवसली नाही. तिला बुधवारी या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. 
जपानच्या सायाका ताकाहाशी हिने साईनाचे आव्हान सरळ दोन गेममध्ये 21-15, 23-21 असे संपुष्टात आणले. 
साईनाला सलग तिसऱ्या स्पर्धेत पहिल्या फेरीत आव्हान गमवावे लागले. कारकिर्दीत तिची पहिल्या फेरीत पराभूत होण्याची ही सहावी वेळ ठरली. सात वर्षांपूर्वी साईनाने ही स्पर्धा जिंकली होती; पण या वेळी तीला गुण मिळविताना अक्षरशः झगडावे लागले. अवघ्या 37 मिनिटांत तिला पराभव पत्करावा लागला. 
साईनाने 7-5 अशा आघाडीसह अश्‍वासक सुरवात केली होती; पण गेमच्या मध्यानंतर सायाकाने लढतीवर वर्चस्व मिळविण्यास सुरवात केली. पिछाडी भरून काढत सायाकाने पहिली गेम सहज जिंकली. दुसऱ्या गेमला साईना 16-20 अशी पिछाडीवर होती. त्या वेळी साईनाने सलग चार गुण घेत बरोबरी साधत लढतीमधील रंगत वाढवली; पण चार गेम पॉइंट वाचवल्यानंतरही तिला दुसरी गेम जिंकता आली नाही. 
यंदाच्या मोसमात साईनाला कोरिया ओपन स्पर्धेत दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून माघार घ्यावी लागली होती. साईनाला सप्टेंबर महिन्यातील चीन ओपन स्पर्धेत थायलंडच्या बहुसानन ओंग्बार्मुनफान हिने पहिल्या फेरीत हरवले होते. या मोसमात साईनाने मलेशिया स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. इंडोनेशिया स्पर्धा जिंकली; पण त्यानंतरही तिच्या कामगिरीत सातत्य दिसून आले नाही. 
दरम्यान, पुरुष एकेरीत समीर वर्माने बाद फेरीत प्रवेश करताना जपानच्या कांता त्सुनेयामा याचा 21-111, 21-11 असा पराभव केला.  किदांबी श्रीकांत याचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. डेन्मार्कच्या आंद्रेस ऍन्टोन्सेन याने त्याचा 21-14, 21-18 असा पराभव केला. 
एन. सिक्की रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा यांनी मिश्रदुहेरीची दुसरी फेरी गाठली. त्यांनी जर्मनीच्या मार्विन सिडेल आणि लिंडा एफ्लर जोडीचा 21-16, 21-11 असा पराभव केला.  
 


​ ​

संबंधित बातम्या