धोनीला मी, सचिन आणि सेहवाग भारतीय संघात नको होतो

वृत्तसंस्था
Saturday, 20 July 2019

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी होणार असून या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचा निर्णय धोनीने निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांना सांगितला आहे.

मुंबई : विश्वकरंडकापासून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. जेव्हा धोनी कर्णधार होता तेव्हा अनेकदा संघ निवडीमध्ये त्याचा हस्तक्षेप असायचा. आता वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत काही दिवस निमलष्करी दलात आता धोनी सेवा बजावणार असल्याची माहिती समोर आली असताना दुसरी धक्कादायक बातमीही समोर येत आहे. 

धोनी जेव्हा कर्णधार होता त्यावेळी संघातील वरिष्ठ खेळाडूंबद्दल त्याचे चांगले मत नव्हते. त्याला आपल्या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि सलामीवीर गौतम गंभीर हे नको होते, असा खुलासा खुद्द गंभीरनेच केला आहे. 

''भारतीय संघ 2012 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी धोनीला मी, सचिन आणि सेहवाग एकत्र भारताच्या संघात नको होतो. आमचे क्षेत्ररक्षण चांगले नाही, असे कारण धोनीने दिले होते. माझ्यासाठी हा सर्वात मोठा धक्का होता," असे गंभीरने खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताला जिंकून देण्यात धोनी कमी पडला. त्यामुळे धोनीने आता निवृत्त व्हावे, अशा चर्चांना आणखी बळ मिळाले. याच पार्श्वभूमीवर धोनीने पुढील दोन महिने निमलष्करी दलासोबत ऑन फिल्ड काम करणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे निवृत्तीच्या दिशेने टाकलेले धोनीचे हे पहिले पाऊल तर नाही ना, अशी चर्चा आता क्रिकेट विश्वात सुरू झाली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी होणार असून या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचा निर्णय धोनीने निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांना सांगितला आहे.


​ ​

संबंधित बातम्या