राज्य ऍथलेटिक्‍स : ठाण्याची डिअँड्रा वेगवान धावपटू 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 June 2019

ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला. 

मुंबई : ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला. 

पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत जयकुमार आणि धुळ्याचा किरण भोसले यांच्यात कडवी चुरस झाली. जयकुमारने अंतिम टप्प्यात जास्त वेग वाढवत किरणचे आव्हान परतवले. जयकुमारने 10.62 सेकंद वेळ नोंदवताना किरणला सात शतांश सेकंदाने मागे टाकले. ठाण्याचा क्षीतिज भोईटे तिसरा आला. 

विद्यापीठ क्रीडा मैदान डिअँड्रासाठी मोलाचे ठरत आहे. तिने या मैदानावरील सलग तिसरी स्पर्धा जिंकली. यापूर्वी तिने वायएमसीए राज्यस्तरीय तसेच ठाणे जिल्हा चाचणी स्पर्धेत बाजी मारली होती. तिने वेगवान सुरुवात केली आणि 11.62 सेकंद वेळ देत सहज बाजी मारली. पुण्याच्या सिद्धी हीरेने (12.08 सेकंद) रौप्यपदक जिंकले. मुंबईची सरोज शेट्टी तिसरी आली. 
पारस पाटील आणि अंकिता गोसावी या पुण्याच्या धावपटूंनी अनुक्रमे पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत तसेच महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत अव्वल क्रमांक मिळवला. किसन तडवीने (14 मि. 33.97 सेकंद) पाच हजार मीटर शर्यत जिंकताना नाशिकच्या नरेंद्र प्रताप सिंगला मागे टाकले. महिलांच्या याच शर्यतीत नाशिकची आरती पाटील (18 मिनिटे 0.69 सेकंद) अव्वल ठरली. 

अंतिम निकाल, पुरुष - 100 मीटर ः 1) जयकुमार गावडे (पुणे, 10.62 सेकंद), 2) किरण भोसले (धुळे), 3) क्षीतिज भोईटे (ठाणे). 800 मीटर ः 1) चैतन्य होलगरे (नाशिक, 1 मि. 55.26 सेकंद), 2) अभिजीत हिरकुड (नाशिक), 3) निशांत जोशी (पुणे). 110 मीटर अडथळा शर्यत ः 1) पारस पाटील (पुणे, 14.68 सेकंद), 2) अमृत तिवाळे (कोल्हापूर), 3) आल्डेन नरोन्हा (उपनगर). पाच हजार मीटर ः 1) किसन तडवी (नाशिक, 14 मि. 33.97 सेकंद), 2) नरेंद्र प्रताप सिंग (नाशिक), 3) कालिदास हिरवे (सातारा). उंच उडी ः 1) सर्वेश कुशारे (नाशिक, 2.05 मी.), 2) अरबाज शेख (नाशिक), 3) अभय गुरव (नंदुरबार). हातोडाफेक ः 1) स्वप्नील पाटील (सांगली, 53.32 मी.), 2) भूषण चिट्टे (नंदुरबार), 3) शंतनू उचले (पुणे). गोळाफेक ः 1) राहुल अहिर (मुंबई, 15.10 मीटर), 2) मेल्विन थॉमस (पुणे), 3) कीर्तीकुमार बेणके (कोल्हापूर). 
महिला - 100 मी ः 1) डिअँड्रा वॅलाडॅरेस (ठाणे, 11.62 सेकंद), 2) सिद्धी हिरे (पुणे), 3) सरोज शेट्टी (मुंबई). 100 मीटर अडथळा ः 1) अंकिता गोसावी (पुणे, 14.52 सेकंद), 2) रिशीका नेपाळी (पुणे), 3) स्नेहल हार्डे (औरंगाबाद). पाच हजार मीटर ः 1) आरती पाटील (नाशिक, 18 मि. 0.69 सेकंद), 2) निकिता राऊत (नागपूर), 3) साईगीता नाईक (मुंबई). थाळीफेक ः 1) संतोषी देशमुख (सोलापूर, 39.78 मी.), 2) निशिगंधा मोरे (कोल्हापूर), 3) सिद्धी कारंडे (सांगली). 
 


​ ​

संबंधित बातम्या