दुबई ओपनमध्ये रौनकने ग्रॅण्डमास्टरला रोखले 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 April 2019

नागपूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख, महिला चेसमास्टर मृदुल डेहनकर व फिडे मास्टर शैलेश द्रविडला 21 व्या दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला. आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानीने भारताचा ग्रॅण्डमास्टर एस. पी. सेथूरामणला बरोबरीत रोखले. 

नागपूर, ता. 4 : नागपूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख, महिला चेसमास्टर मृदुल डेहनकर व फिडे मास्टर शैलेश द्रविडला 21 व्या दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला. आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानीने भारताचा ग्रॅण्डमास्टर एस. पी. सेथूरामणला बरोबरीत रोखले. 

लागोपाठ दोन विजय नोंदविणाऱ्या दिव्याची विजयी मोहिम उझबेकिस्तानचा ग्रॅण्डमास्टर अब्दुसत्तोरोव्ह नोदिरेकने रोखली. अब्दुसत्तोरोव्हच्या आक्रमक खेळापुढे दिव्याचा अनुभव कमी पडला. तीन फेऱ्यांमध्ये दोन गुणांची कमाई करणाऱ्या दिव्याचा चौथा सामना फिलीपाइन्सचा फिडेमास्टर अबेलगस रोएलशी होईल. या पराभवामुळे दिव्याच्या ग्रॅण्डमास्टर किताब मिळविण्याच्या आशेलाही मोठा धक्‍का बसला आहे. मृदुलला भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. राजा ऋत्विककडून पराभवा सामना करावा लागला. तीन फेऱ्यांमध्ये केवळ एक गुण मिळविणाऱ्या मृदुलचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव होय. चौथ्या फेरीत तिच्यापुढे भारताच्या व्ही. नंदिताचे आव्हान राहील. 

दुसऱ्या फेरीत भारतीय ग्रॅण्डमास्टर विष्णू प्रसन्नाला बरोबरीत रोखून धरणाऱ्या द्रविडला भारताचा ग्रॅण्डमास्टर देवाशिष दासने पराभूत केले. तीन फेऱ्यांमध्ये दीड गुणांची कमाई करणाऱ्या द्रविडचा चौथ्या फेरीत भारताच्या शन्या मिश्राविरुद्‌ध सामना होईल. तिसऱ्या फेरीत रौनकने मात्र शानदार कामगिरी केली. त्याने अनुभवी एस. पी. सेथुरामणला बरोबरीत रोखून महत्त्वपूर्ण अर्धा गुण पटकाविला. नागपूरकर बुद्धिबळपटूंमध्ये सध्या सर्वाधिक अडीच गुणांची कमाई करणाऱ्या रौनकची चौथ्या फेरीत आणखी एक परिक्षा होणार आहे. चौथ्या फेरीत त्याच्यापुढे व्हेनेझुएलाचा ग्रॅण्डमास्टर इतुरिझाबा बोनेली एडुआर्डोचे आव्हान राहील.


​ ​

संबंधित बातम्या