World Cup 2019 : भुवनेश्‍वर किमान दोन सामन्यांना मुकणार

वृत्तसंस्था
Monday, 17 June 2019

शिखर धवन पाठोपाठ भारतीय संघाला वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार जखमी होण्याचा फटका बसला आहे.

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : शिखर धवन पाठोपाठ भारतीय संघाला वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार जखमी होण्याचा फटका बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. आता तो किमान दोन ते तीन सामने खेळू शकणार नाही, असे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्‍वरला हा त्रास जाणवू लागला. वेदना असह्य होऊ लागल्यामुळे त्याने लगोलग मैदान सोडले होते. सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने भुवनेश्‍वर जखमी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तो म्हणाला, "भुवनेश्‍वरची दुखापत गंभीर नाही. विश्रांतीमुळे खूप फरक पडेल. त्यामुळे भुवनेश्‍वर अफगाणिस्तान (ता.22) आणि वेस्ट इंडिज (ता.27) विरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. महिना अखेरीस 30 जून रोजी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या लढतीसाठी तो उपलब्ध असेल अशी आशा आहे.''

भुवनेश्‍वरच्या दुखापतीविषयी अधिक बोलताना कोहली म्हणाला, "खेळपट्टीवर असलेल्या फूटमार्कवरून घसरल्याने ही दुखापत झाली आहे. सध्या तरी तिचे स्वरुप गंभीर नाही. आम्ही त्याला बरे होण्यासाठी वेळ देणार आहोत. मात्र, किमान तीन सामने तो खेळू शकणार नाही, हे नक्की.'' भुवनेश्‍वर जखमी असला, तरी भारताकडे महंमद शमीच्या रुपाने योग्य पर्याय उपलब्ध आहे. 

दुखापत किरकोळ आहे. विश्रांती घेतल्यास वेळेत तंदुरुस्त होईन, असा विश्‍वास वाटतो. 
- भुवनेश्‍वर कुमार, भारतीय गोलंदाज


​ ​

संबंधित बातम्या