आशियाई ऍथलेटिक्‍स : अनुला रौप्य, पारुल, पुवम्माला ब्रॉंझ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 April 2019

राष्ट्रीय विक्रमवीर असलेल्या अनूने पहिल्याच प्रयत्नात फेकलेला 60.22 मीटर अंतरावरील भाला तिला रौप्यपदक देऊन गेला. यात चीनच्या ली हुईहुईने 65.83 मीटरच्या नवीन स्पर्धा विक्रमाची नोंद केली.

नागपूर : आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत कुमार विश्‍वविजेती हिमा दास जयाबंदी झाल्याचा भारतास बसलेला धक्का दिवस अखेरीस अनु राणीचे (भाला फेकी) रौप्य, पारुल चौधरीचे (5 हजार मीटर) पुवम्माच्या (400 मीटर स्टिपलचेस) ब्रॉंझपदक आणि अविनाश सावळेच्या (3000मी स्टिपलचेस) रौप्य पदक काहीसा सौम्य झाला. ही स्पर्धा दोहा येथील खलिफा स्टेडियमवर रविवारपासून 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेला सुरवात झाली. पुरुषांच्या 3000 मीचर स्टिपलचेस शर्यतीत अविनाशने पिछाडी भरुन काढत 8 मि. 30.19 सेकंद अशी वेळ देत रौप्य पदक पटकाविले. 

राष्ट्रीय विक्रमवीर असलेल्या अनूने पहिल्याच प्रयत्नात फेकलेला 60.22 मीटर अंतरावरील भाला तिला रौप्यपदक देऊन गेला. यात चीनच्या ली हुईहुईने 65.83 मीटरच्या नवीन स्पर्धा विक्रमाची नोंद केली. महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत पारुल चौधरीने पहिल्याच प्रयत्नात ब्रॉंझपदक जिंकण्याची कामगिरी केली. तिने 15 मिनिटे 36.03 सेकंद ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ दिली. तिने नाशिककर संजीवनी जाधवला चौथ्या स्थानावर ढकलले. संजीवनीने 15 मिनिटे 43.33 सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ दिली. यात आफ्रिकन वंशाच्या बहरीनच्या धावपटूंनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. 

दरम्यान हिमा दास एक-दोन दिवसांत तंदुरुस्त होईल, असे डॉक्‍टर सांगत असले तरी ती महिलांच्या 4-400 आणि मिश्र रिलेत धावणार का याविषयी भारतीय संघाचे प्रशिक्षक राधाकृष्णकृष्णन नायर यांनी निश्‍चित माहिती दिली नाही. सकाळी चारशे मीटर शर्यतीला सुरवात झाल्यानंतर हिमाच्या पायाचा स्नायू दुखावला गेला. यामुळे ती शर्यत पूर्ण करू शकली नाही. ही दुखापत गंभीर नसून चिंता करण्यासारखी नाही, असे डॉक्‍टरांनी सांगतल्याची माहिती नायर यांनी दिली. त्यामुळे चारशे मीटरमध्ये भारताच्या आशा अनुभवी एम.आर. पुवम्मावर होत्या. अखेर पुवम्माला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. 

पुरुषांच्या चारशे मीटर शर्यतीत पदकाचे दावेदार असलेले आरोक्‍य राजीव व महंमद अनस यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. राजीवने प्राथमीक फेरीत प्रथम स्थान मिळविताना 46.25 सेकंदात शर्यत पूर्ण केंली. अनसनेही आपल्या शर्यतीत अव्वल स्थान मिळविले. उपांत्य फेरीत राजीवने प्रथम स्थान मिळविले, तर अनसने वेगवान वेळेच्या आधारावर अंतिम फेरी गाठली. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या जिन्सॉन जॉन्सनने आठशे मीटर शर्यतीत उपांत्य फेरी गाठताना प्राथमीक फेरीत कतारच्या जमाल हैराने पाठोपाठ दुसरे स्थान मिळविले. मंजीत सिंगच्या माघारीमुळे संघात आलेल्या महंमद अफजलने प्रउपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेल आणि महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत एम. गोमतीने अंतिम फेरीत स्थान मिळविले. 

द्युती चंदचा राष्ट्रीय विक्रम 

महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रमवारी द्युती चंदने आपल्याच विक्रमात सुधारणा केली. तिने 11.28 सेकंदाचा नवीन विक्रम नोंदविताना गेल्यावर्षी गुवाहाटी येथे नोंदविलेला 11.29 सेकंदाचा विक्रम मोडित काढला. या कामगिरीमुळे ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली.


​ ​

संबंधित बातम्या