World Cup 2019 : मॉर्गन आणि इंग्लंडची दे दणादण

शैलेश नागवेकर 
Tuesday, 18 June 2019

दोन दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान सामना झालेल्या मॅंचेस्टरच्या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचे पुरते तीन तेरा वाजवले.

मॅंचेस्टर : चौकारांपेक्षा षटकारांची अधिक बरसात झालेल्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची पुरती धुलाई केली. यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 6 बाद 397 धावांचा हिमालय त्यांनी उभा केला. इंग्लंड कर्णधार इऑन मॉर्गनने तुफानी शतक करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक 17 षटकारांचा विक्रम केला. 

दोन दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान सामना झालेल्या मॅंचेस्टरच्या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचे पुरते तीन तेरा वाजवले. या दरम्यान अनेक विक्रमही मोडले गेले. हताश झालेल्या अफगाण गोलंदाजांना पळता भूई थोडी झाली. 21 चौकार आणि 25 षटकांचे तुफान मॅंचेस्टरच्या मैदानावर आले. यातील 17 षटकार एकट्या मॉर्नगनने मारले.

मॉर्गनला 28 धावांव जीवदान मिळाले होते त्याने पुढील 120 धावा अवघ्या 45 चेंडूत झळकावल्या. इंग्लंडने अखेरच्या 10 षटकांत तब्बल 142 धावा कुटल्या. आयपीएलमध्ये सर्वात भेदक गोलंदाज म्हणून लौकिक मिळवणारा लेगस्पिनर रशिद खान विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने आपल्या 9 षटकांत 110 धावा दिल्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम 113 चा आहे. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत संभाव्य विजेते म्हणून पसंती मिळत असलेल्या इंलंडने वेस्ट इंडीजविरूद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता त्यांच्या सर्व सामन्यात तिनशे धावांच्या पलिकडे मजल मारली आज तर 400 धावांचा टप्पा तीन धावांनी अपूरा राहिला. (वेस्ट इंडीजला 212 धावांत गुंडाळले होते त्यामुळे त्यांना तिनशे धावांची संधी मिळाली नव्हती). 
फलंदाजीस उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली.

बांगलादेशची गोलंदाजी अगोदरच दुबळी आहे त्यात त्यांनी क्षेत्ररक्षणातही चुका केल्या. मैदानी क्षेत्ररक्षणाबरोबर त्यांनी झेलही सोडले आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. बेअरस्टॉ (90) आणि ज्यो रूट (88) यांची शतके हुकली, पण मॉर्गनने मैदानात आल्या आल्या तुफानी टोलेबाजी सुरु केली. 71 चेंडूतील 148 धावांपैकी 118 धावा त्याने चौकार आणि षटकारांनीच पूर्ण केल्या.

मॉर्गनचा हा झंझावात 47 व्या षटकांत थांबला तोपर्यंत हतबल झालेल्या अफगाण गोलंदाजांतील दलवत झद्रानने जॉस बटलर आणि बेन स्टोक्‍स या धडाकेबाज फलंदाजांनी झटपट बाद केले खरे परंतु मोईन खानने तब्बल 345 च्या स्ट्राईक रेटने नऊ चेंडूतच नाबाद 31 धावा झळकावल्या. 

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकांत 6 बाद 397 (जॉनी बेअरस्टॉ 90 -99 चेंडू, 8 चौकार, 3 षटकार, ज्यो रूट 88 -82 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, इयॉन मॉर्गन 148 -71 चेंडू, 4 चौकार, 17 षटकार, मोईन अली नाबाद 31 -9 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, दलवत झद्रान 10-0-85-3, गुलबदीन नबी 10-0-68-3, रशिद खान 9-0-110-0) 


​ ​

संबंधित बातम्या