INDvsENG : आता एकदिवसीय क्रिकेटची धुळवड
पुण्यात आजपासून रंगणार मालिका, भारतीय संघाचे वर्चस्व अपेक्षित
पुणे : फिरकीच्या आखाड्यात कसोटी मालिका जिंकल्यावर भारतीय संघाने ट्वेन्टी-20 चा थरार पहिला सामना गमावल्यानंतर जिंकला. आता होळी पौर्णिमेची दिवशी सांगता होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत धावांची धुळवड होणार हे निश्चित आहे. कसोटी, ट्वेन्टी-20 मालिका जिंकल्यामुळे आणि नवोदित खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असल्यामुळे भारताचे पारडे निश्चितच जड आहे.
नुकतीच संपलेली ट्वेन्टी-20 मालिका चांगली रंगली होती. 2-2 बरोबरीनंतर निर्णायक सामन्यात जबरदस्त खेळ करून भारतीय संघाने दणदणीत यश मिळवले. यंदा भारतात होणाऱ्या विश्वकरंडक ट्वेंटी-20 स्पर्धेचा विचार करून दोन्ही संघांनी आपाल्या ताकदीचा अंदाज घेतला. या पार्श्वभूमीवर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका कागदावर निरर्थक वाटत होती. निवड समितीने संपूर्ण ताकदीचा भारतीय संघ निवडून सुखद धक्का दिला. इंग्लंड संघातही दर्जेदार खेळाडू असल्याने पुण्यातील तीन सामन्यांची मालिकाही तेवढीच रंगदार होण्याची अपेक्षा आहे.
रोहित-शिखर सलामी
भारतीय संघाकडून सलामीला कोण येणार याची उत्सुकता विराट कोहलीने संपवली. त्याने रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडीच सलामीला येईल हे स्पष्ट केले. ट्वेन्टी-20 सामन्यात चमकदार फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला संधी मिळेल. गोलंदाजीत महंमद सिराजसोबत कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघातून खेळायची संधी मिळण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या वनडेत सचिन-सेहवाग करणार ओपनिंग; Memes का होतायत व्हायरल
लक्षवेधक
बेन स्टोक्स विश्वकरंडकानंतरची पहिली एकदिवसीय लढत खेळणार
भारत तसेच इंग्लंडचा यापूर्वीच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-2 हार
विश्वकरंडक स्पर्धेपासून भारतीय गोलंदाजांची पॉवरप्लेमध्ये सर्वात वाईट कामगिरी. या कालावधीत 144.16 च्या सरासरीने 6 विकेट. इंग्लंडच्या 17 विकेट 23 च्या सरासरीने
2010 पासून भारताने मायदेशात तीन वन डे मालिका गमावल्या आहेत.
आज पहिली वन-डे
ठिकाण - एमसीए स्टेडियम, पुणे
थेट प्रक्षेपण - दु. 1.30 पासून
खेळपट्टीचा अंदाज - फलंदाजीस पूर्णपणे अनुकूल, येथील चारपैकी तीन लढतीत तीनशे धावांचा पाठलाग यशस्वी
हवामानाचा अंदाज - हवामान खात्यानुसार वादळी पावसाची शक्यता, तर ॲक्यूव्हेदरनुसार सामना सुरू असताना स्वच्छ हवामान, पण दुसऱ्या सत्राच्यावेळी आकाश ढगाळलेले.